Friday 16 August 2024

एक सकाळ

गाढ झोपेतून जागा होऊन ताडकन उठून बसलो की लगेच चक्कर आली. माहीती होते जाग आली की लगेच असे ताडकन न उठता एका अडंगावर येऊन उठायचे असते. विचारच इतका विलक्षण होता की ही बाबच क्षुल्लक वाटली. चावी घेऊन खाली गेलो. गाडी सुरू केली आणि निघालो. ना दात धुतले ना चूळ भरली.

काही काही विचार न करता निघून गेलो. वळणावर वळणे झाली. झाडा मागे  झाडे गेली , गाड्या पुढे गेल्या. संथ एकाच गतीने माझी गाडी आणि मी मात्र समोर जातं होतो.

शेवटी रस्त्याच्या डाव्या बाजूला मी गाडी वळवली. इतक्या वळणाच्या रस्त्यात इतका चांगला पैस असलेला वळण पाहून बरे वाटले. त्या सकाळच्या विचाराचा विचार करुन मी लगेच गाडी स्टॅंड ला लावली आणि दगडे बाजूला करायला घेतली. कितीतरी दगडे होती, ढीगभर अन् कचराही.

शेवटचा दगड हलवला आणि मग माती उकरून खड्यातली पेटी बाहेर काढली. पेटीत असणारी वही पाहून कितीतरी वर्षांचा थांबवून ठेवलेला बांध तुटला आणि माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वहात होते. स्वतःलाच परत कितीतरी वर्षांनी भेटलो असे वाटत होते. जणू आरसाच समोर होता. कुणाचं साठी नसलेल्या पण मी केलेल्या कवितांची ती वही होती. लिहिलेले छोटे लेख होते.

डोळे पुसतं पुसतं मी एकेक कविता वाचत होतो. 

अचानक खोल खोल अंधाऱ्या खड्ड्यातून मला मीच आवाज देतोय असा भास होतं होता. आणि मी एकदम जागा झालो. ७ वाजले होते. अंघोळ करून कामाला निघायचे होते. संध्याकाळी फ्लॅट शोधायचा होता. निघायचे होते कामावर.

Saturday 13 July 2024

ढग अन् वारा

 ढगांच्या वाहतूकीला पर्वतांचा सिग्नल लागला की पाऊस पडतो. ढग ही कधीच सिग्नल तोडत नाहीत.हा आता वारा फार तर त्यांना वेगळ्या दिशेला घेऊन जातो एवढच. दूर डोंगरावरून ढगाच्या बाजूला बसून पाऊस पहाण्याच सुख वेगळ आहे. अंग भिजले नाही तरी मन चिंब झालेले असते. कुणी तरी वाचलेली कविता जणू मीच लिहीली की काय असा वेगळा अनुभव येतो.

गारवाची गाणे ऐकताना सतत असे अल्हाददायक वाटते जसे कुणीतरी उकाड्यात पाणी शिंपडत असावे अन् अगदी तसाच शिंपडा ह्या डोंगरावर जाणवतो. वारा कुठेतरी सोबत घेऊन जाऊन बसवेल आणि रागात ओरडेल की कधीतरी माझ्यावर ही गाणि लिहा. मी तिचे कसे उडवतो म्हणून तर तुम्हाला कविता सुचते. निसर्ग बोलतो का माहीत नाही पण आपल्याला त्याला ऐकता आले की बरेचसे प्रश्न सुटतात. 

- संजीत चौधरी


Saturday 22 June 2024

समुद्र_अन_बाबा

 फादर्स डे येऊन गेला आता तो आपण साजरा करावा की नाही हा वादाचा विषय आहे पण संसाराचा भार वाहणाऱ्या वडिलांविषयी कृतज्ञतेचा एक तरी दिवस असावा हे मात्र खरे. समुद्र आणि वडिल हे सारखेच वाटतात. वरून कितीही शांत असले तरी आतमधे काय कालवाकालव सुरू असते ते त्यांनाच माहीती. सगळ काही आत ठेवून स्थितप्रज्ञतेने वागणे हे फार काही सोपे काम नाही .

फक्त सागराशी बोलायाला सगळे येतात वडिलांशी शेअर करणे पिढीनुसार बदलत गेले तरी ते तितके सराईत नाही .

किनाऱ्यावर सगळे येतात. दुःख झाले म्हणून येणारे , तर झालेले दुःख विसरणारे किंवा आठवून त्यावर रडत बसणारे , आनंद साजरा करणारे , सुखाची वाटणी करणारे, काळाचा वेध घेणारे. सगळे येतात आणि समुद्र सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतो . फारच पटले नाही तर एखादी जोरात लाट आणून धडकतो ते तेवढेच.


“सागराने नाविका मनी संकट मोठे पेरले होडीस एका दशदिशांनी घेरले.”


समुद्र  भीती पेक्षा नाविकाला परिस्थिती साठी तयार करतो असेच वाटते मला ह्या कवितेतून. जसे वडिल नको वाटणारी छोटी छोटी कामे सांगून आपल्याला मोठे करत असतात.

काही सहवास असे असताता जे जाणवत नाहीत पण परिणाम कारक असतात. 

 कमी सहवास  लाभलेल्यांच किंवा सहवासच लाभला नाही त्यांच दुःख हे कुणीच समजू शकत नाही. त्यांनी कधीतरी समुद्राशी बोलावं बाबाला आठवून बाकी लोकांनी दोघांशी बोलावं.

एक सकाळ

गाढ झोपेतून जागा होऊन ताडकन उठून बसलो की लगेच चक्कर आली. माहीती होते जाग आली की लगेच असे ताडकन न उठता एका अडंगावर येऊन उठायचे असते. विचारच इ...