गाढ झोपेतून जागा होऊन ताडकन उठून बसलो की लगेच चक्कर आली. माहीती होते जाग आली की लगेच असे ताडकन न उठता एका अडंगावर येऊन उठायचे असते. विचारच इतका विलक्षण होता की ही बाबच क्षुल्लक वाटली. चावी घेऊन खाली गेलो. गाडी सुरू केली आणि निघालो. ना दात धुतले ना चूळ भरली.
काही काही विचार न करता निघून गेलो. वळणावर वळणे झाली. झाडा मागे झाडे गेली , गाड्या पुढे गेल्या. संथ एकाच गतीने माझी गाडी आणि मी मात्र समोर जातं होतो.
शेवटी रस्त्याच्या डाव्या बाजूला मी गाडी वळवली. इतक्या वळणाच्या रस्त्यात इतका चांगला पैस असलेला वळण पाहून बरे वाटले. त्या सकाळच्या विचाराचा विचार करुन मी लगेच गाडी स्टॅंड ला लावली आणि दगडे बाजूला करायला घेतली. कितीतरी दगडे होती, ढीगभर अन् कचराही.
शेवटचा दगड हलवला आणि मग माती उकरून खड्यातली पेटी बाहेर काढली. पेटीत असणारी वही पाहून कितीतरी वर्षांचा थांबवून ठेवलेला बांध तुटला आणि माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वहात होते. स्वतःलाच परत कितीतरी वर्षांनी भेटलो असे वाटत होते. जणू आरसाच समोर होता. कुणाचं साठी नसलेल्या पण मी केलेल्या कवितांची ती वही होती. लिहिलेले छोटे लेख होते.
डोळे पुसतं पुसतं मी एकेक कविता वाचत होतो.
अचानक खोल खोल अंधाऱ्या खड्ड्यातून मला मीच आवाज देतोय असा भास होतं होता. आणि मी एकदम जागा झालो. ७ वाजले होते. अंघोळ करून कामाला निघायचे होते. संध्याकाळी फ्लॅट शोधायचा होता. निघायचे होते कामावर.
No comments:
Post a Comment
खूप आभारी आहे.🙏🏼