Friday, 16 August 2024

एक सकाळ

गाढ झोपेतून जागा होऊन ताडकन उठून बसलो की लगेच चक्कर आली. माहीती होते जाग आली की लगेच असे ताडकन न उठता एका अडंगावर येऊन उठायचे असते. विचारच इतका विलक्षण होता की ही बाबच क्षुल्लक वाटली. चावी घेऊन खाली गेलो. गाडी सुरू केली आणि निघालो. ना दात धुतले ना चूळ भरली.

काही काही विचार न करता निघून गेलो. वळणावर वळणे झाली. झाडा मागे  झाडे गेली , गाड्या पुढे गेल्या. संथ एकाच गतीने माझी गाडी आणि मी मात्र समोर जातं होतो.

शेवटी रस्त्याच्या डाव्या बाजूला मी गाडी वळवली. इतक्या वळणाच्या रस्त्यात इतका चांगला पैस असलेला वळण पाहून बरे वाटले. त्या सकाळच्या विचाराचा विचार करुन मी लगेच गाडी स्टॅंड ला लावली आणि दगडे बाजूला करायला घेतली. कितीतरी दगडे होती, ढीगभर अन् कचराही.

शेवटचा दगड हलवला आणि मग माती उकरून खड्यातली पेटी बाहेर काढली. पेटीत असणारी वही पाहून कितीतरी वर्षांचा थांबवून ठेवलेला बांध तुटला आणि माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वहात होते. स्वतःलाच परत कितीतरी वर्षांनी भेटलो असे वाटत होते. जणू आरसाच समोर होता. कुणाचं साठी नसलेल्या पण मी केलेल्या कवितांची ती वही होती. लिहिलेले छोटे लेख होते.

डोळे पुसतं पुसतं मी एकेक कविता वाचत होतो. 

अचानक खोल खोल अंधाऱ्या खड्ड्यातून मला मीच आवाज देतोय असा भास होतं होता. आणि मी एकदम जागा झालो. ७ वाजले होते. अंघोळ करून कामाला निघायचे होते. संध्याकाळी फ्लॅट शोधायचा होता. निघायचे होते कामावर.

Saturday, 13 July 2024

ढग अन् वारा

 ढगांच्या वाहतूकीला पर्वतांचा सिग्नल लागला की पाऊस पडतो. ढग ही कधीच सिग्नल तोडत नाहीत.हा आता वारा फार तर त्यांना वेगळ्या दिशेला घेऊन जातो एवढच. दूर डोंगरावरून ढगाच्या बाजूला बसून पाऊस पहाण्याच सुख वेगळ आहे. अंग भिजले नाही तरी मन चिंब झालेले असते. कुणी तरी वाचलेली कविता जणू मीच लिहीली की काय असा वेगळा अनुभव येतो.

गारवाची गाणे ऐकताना सतत असे अल्हाददायक वाटते जसे कुणीतरी उकाड्यात पाणी शिंपडत असावे अन् अगदी तसाच शिंपडा ह्या डोंगरावर जाणवतो. वारा कुठेतरी सोबत घेऊन जाऊन बसवेल आणि रागात ओरडेल की कधीतरी माझ्यावर ही गाणि लिहा. मी तिचे कसे उडवतो म्हणून तर तुम्हाला कविता सुचते. निसर्ग बोलतो का माहीत नाही पण आपल्याला त्याला ऐकता आले की बरेचसे प्रश्न सुटतात. 

- संजीत चौधरी


Saturday, 22 June 2024

समुद्र_अन_बाबा

 फादर्स डे येऊन गेला आता तो आपण साजरा करावा की नाही हा वादाचा विषय आहे पण संसाराचा भार वाहणाऱ्या वडिलांविषयी कृतज्ञतेचा एक तरी दिवस असावा हे मात्र खरे. समुद्र आणि वडिल हे सारखेच वाटतात. वरून कितीही शांत असले तरी आतमधे काय कालवाकालव सुरू असते ते त्यांनाच माहीती. सगळ काही आत ठेवून स्थितप्रज्ञतेने वागणे हे फार काही सोपे काम नाही .

फक्त सागराशी बोलायाला सगळे येतात वडिलांशी शेअर करणे पिढीनुसार बदलत गेले तरी ते तितके सराईत नाही .

किनाऱ्यावर सगळे येतात. दुःख झाले म्हणून येणारे , तर झालेले दुःख विसरणारे किंवा आठवून त्यावर रडत बसणारे , आनंद साजरा करणारे , सुखाची वाटणी करणारे, काळाचा वेध घेणारे. सगळे येतात आणि समुद्र सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतो . फारच पटले नाही तर एखादी जोरात लाट आणून धडकतो ते तेवढेच.


“सागराने नाविका मनी संकट मोठे पेरले होडीस एका दशदिशांनी घेरले.”


समुद्र  भीती पेक्षा नाविकाला परिस्थिती साठी तयार करतो असेच वाटते मला ह्या कवितेतून. जसे वडिल नको वाटणारी छोटी छोटी कामे सांगून आपल्याला मोठे करत असतात.

काही सहवास असे असताता जे जाणवत नाहीत पण परिणाम कारक असतात. 

 कमी सहवास  लाभलेल्यांच किंवा सहवासच लाभला नाही त्यांच दुःख हे कुणीच समजू शकत नाही. त्यांनी कधीतरी समुद्राशी बोलावं बाबाला आठवून बाकी लोकांनी दोघांशी बोलावं.

Tuesday, 14 November 2023

नवरात्रातील कीर्तनांचे सार

 माझ्या गावात मुदखेडमधे श्री कालेजी देवी (मूळ स्थान माहूर) मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव खूप उत्साहात साजरा करतात. कीर्तन , भजन आणि असे असंख्य उपक्रम राबवतात. जे कीर्तन ऐकण्याचा योग आला त्या कीर्तनांचा सार लिहीण्याचा प्रयत्न केला आहे.

*अश्विन शुध्द तृतीयेला झालेल्या कीर्तनाचे सार..*


कीर्तनकार : ह.भ.प. विक्रमजी नांदेडकर 

आपला एकच धर्म आहे ज्यात ज्ञानोबा माऊली जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात म्हणू शकतात.परंतू धर्माने दिलेली सुविधा आणि सूटचा अतिरेक धर्म विमुख कार्य करण्याचे प्रमाणपत्र नसते हे आपल्याला कळायला हवे .

विकार युक्त मन आणि व्याधी ग्रस्त देह हे समान आहेत पण देहाचे उपचार वैद्य करू शकतील पण मनाचे उपचार आपली सद्गविवेक बुध्दी आणि विकारहीन मनाने भगवंताचे नामस्मरण यानेच होऊ शकतात.

संतांच्या चरित्रात कारूण्य असूनही सुख, समाधान आणि भगवंताचे अधिष्ठान आहे आणि आपल्याला त्यांच्या तुलनेत सुख असूनही आचरणात , बोलण्यात कारूण्यच असते. 

आपले आचरण धर्मसंगत होईल, ग्रंथ वाचण्यापेक्षा जास्त त्यांच आचरण जास्त होईल तेव्हा आपण देवाला आपल्या जवळ घेऊन येऊ.

केशवसुतांची कविता आहे ,त्यातल्या चार ओळी .

“सदा पद्य घोकोनियां शीण येतो

सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ॥

खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ “

*अश्विन शुध्द चतुर्थीला झालेल्या कीर्तनाचे सार…*

कीर्तनकार : ह.भ.प. रामकृष्ण महाराज जामकर

करून करून भागले आणि देवपूजेस लागले आपण असे साधारण म्हणत असतो. सामान्य मनूष्याच्या आयुष्याचा भागच पैसे कमावून, सुख मिळवून मग भगवंताच्या चरणी लीन व्हावे ह्या गृहितकावर आधारित असतो. पण आयुष्याच्या कोणत्याही आश्रमात भगवंत स्मरण हे लागतेच. भगवंताचे स्मरण म्हणजेच स्वतःच्या रूपाला , स्वतःच्या जन्माचे कारण कळणे हाच होय. संत मीराबाईंचे चरित्रातून आपल्याला हेच शिकायला मिळते .

स्वतःच्या सत्वाला ओळखणे हाच खरा मोक्ष होय आणि ह्याला प्राप्त करायला  भगवंताचे स्मरण हा उपाय होय. द्वैताकडून अद्वैताकडू जाण्याचा प्रवास म्हणजेच स्वतःमधील भगवंताला शोधणे होय. रामदास स्वामींच्या ओळी इथे सार्थ ठरतात.


जनीं सर्वसूखी असा कोण आहे।

विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥

मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।

तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥

*अश्विन शुध्द पंचमीला झालेल्या कीर्तनाचे सार..*


कीर्तनकार : ह.भ.प. अवधूत महाराज टाकळीकर


हिंदू धर्मात चार आश्रम, चार पुरूषार्थ आणि सोळा संस्कार असून ह्या सर्वांना बांधणार दुवा कोणता असेल तर ते म्हणजे तुमचे कर्म.

जसे क्रियेविन वाचळता व्यर्थ आहे अशी म्हण आहे म्हणजेच फक्त बोलून दाखवण्यापेक्षा कृती करावी असा अर्थ होतो तसेच कर्मेविना जन्म व्यर्थ होय असेच म्हणावे लागेल. कर्म जसे असेल तसे भोग, तसे फळ तर मिळतेच.

आयुष्याचे संचित काय असेल तर ते तुमचे कर्म होय. मनुष्याने परमेश्वाराचे चिंतन करावेच पण कधी तरी निवांत बसून आपल्याच चालू आयुष्यातील कर्मांचे चिंतन करणे ही कर्मप्राप्त आहे. कर्माचे चिंतन हाच संसरीक ते ऐहीक ह्या प्रवासाचा दुवा म्हंटले तरी वावगे ठरणार नाही . कर्माचे चिंतन हाच आनंदाचा मार्ग होय. समर्थ सांगतात तसे


मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते।

अकस्मात होणार होऊनि जाते॥

घडें भोगणे सर्वही कर्मयोगे।

मतीमंद तें खेद मानी वियोगें ॥


- संजीत चौधरी 

Saturday, 11 April 2020

अनंताचे फुल

आपण प्रवास करत असताना एखादे झाड, एखादं घर आपल्याला आपलं वाटून जात. वाटतं ह्याचा आणि माझा संबंध फार जवळचा आहे .घट्ट ऋणानुबंध आहे. काही घटना आपल्या आयुष्यात आधी घडून गेल्यासारख्या वाटतात त्या सगळ्या प्रकाराला  देजावू म्हटलं जात. पण जेव्हा एखादी वस्तू , एखादं झाड पाहिल्या-पाहिल्या त्याचा ऋणानुबंध जाणवतो त्याला काय म्हणणार आपण ?
 मला वाटतं उत्तर आपल्या संवेदनशील मनात आणि त्यावर झालेल्या  जडणघडणीमधे आहे. निसर्गाच्या सानिध्यात वाढलेल्या माणसाला सिमेंटच्या शहरात छोटंसं रोपट पाहूनही सकारात्मक वाटतं. श्रीमंत माणसाला एखादी नवीन कार पाहून सकारात्मक वाटत असेल .
        आपल्या आवडीनिवडी ,आपल्याला लाभलेला सहवास ह्या सगळ्या गोष्टी समोर येणाऱ्या वस्तूशी आपला आगंतूक संबंध सोडून जातात. तसाच संबंध माणसांशी देखील  जोडला जातो.अनोळखी शहरात गाडीची नंबर प्लेट MH_२६ पाहीली की आम्हा नांदेडकरांचा उर उचंबळून येतो. विदर्भाच पिठलं जिथे मिळत कळलं की  वऱ्हाडी पोरं तिथे धूम ठोकतात. समोरच्या माणसाची एक सवय त्या माणसाला आपल्या हृदयाची  वेगळी जागा देऊन टाकते. ती सवय माणसाच्या रंगरूप, देखणेपणा या सर्वांच्या निरपेक्ष असते . प्रेमाचा ,आपुलकीचा अंकुर फुटायला या आगंतूक परिचयाचा आधारही महत्त्वाचा असतो. "द. मा. धामणस्कर" ह्यांनी याचे यथार्थ वर्णन फार सुंदर  ओळींनी केलेले आहे.


                          "  तुझ्या केसात
                अनंताचे फूल आहे म्हणजे
                तुझ्याही अंगणात अनंताचे
                झाड आहे, ह्या जाणिवेने मी
                मोहरुन जातो.
                नावगाव माहीत नसतानाही तुझे, आपल्यात
                एक तरल संबंध रुजून
               आलेला मी पाहतो…"


 तू तुझ्या लांब केसात अनंताचे फुल माळतेस.( तुम्हाला जे आवडतं, तुम्हाला आवडणाऱ्या मुलींने जे फुल माळले ते घ्या)
तू माळतच आहेस तर मी असं समजून घेतो , तुझ्या घरात अनंताचे झाड आहे. त्या झाडाला तू प्रेमाने वाढवले आहेसं , जोपासत आहेस .त्याचा गंध तुला मोहित करतो. तुझ्या चेहऱ्यावर असणाऱ्या ताजेपणाचे कारण ते अनंताचे  झाड आणि त्याच्या प्रती असलेले तुझे प्रेम आहे. तुला त्या झाडाविषयी, फुलांविषयी, निसर्गाविषयी ममत्व आहे. सृष्टी सौंदर्याची लोचने म्हणून अनंताचे झाड, तू तुझ्या अंगणात वाढवले आहेस.
           तुझे अंगण  किती मोठे किती लहान आहे हे मला माहित नाही पण; तु त्या अनंताला वाढवले आहेस हे खूप आहे.फक्त तुला पाहून आणि त्या सुंदर फुलाला तुझ्या लांब वेणीत माळलेले पाहून  मला आपल्यात एकत्र संबंध रूजतोय हा विचार ,हा अनुभवही मोहरून टाकतो आहे.  ह्यावेळी मला तुझे नाव- गाव  काहीही माहित नाही,  पण तू आता अनोळखी नाहीस हे मात्र खरे.
         किती निष्पाप आणि निर्वाज्य भावनेने धामणस्कर ह्यांनी मानवी स्वभाव उलगडला आहे.मानव म्हणून आपण सतत प्रेम, आपुलकी शोधत असतो.आपण आपल्या सारखी माणसे शोधत असतो.आणि आवडी,जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ,घडणाऱ्या आणि घडवणाऱ्या गोष्टींचा परिणाम आणि त्याविषयी मत हे जुळून आले तर प्रेमाचा अंकुर नकळत फुटतो.
         गुलाबाच्या काट्याचाही विचार करणारे आगंतूक एकत्र येऊन फुलबाग फुलवतात तेव्हा ती तरलता मोहून टाकणारी असतेच.

Saturday, 9 March 2019

पुष्पक विमान


आजोबांच्या थरथरत्या हातांना धरून घेऊन जा पुष्पक विमान पहायला.
तुमच्या सर्वात पहिल्या मैत्रीची सुरवात आठवेल.
तो पहिला मित्र आठवेल जो आता बाजूला बसलाय ज्याने निरपेक्ष मैत्री काय असते नकळत शिकवल.
लाड पुरवणार हक्काच माणूस म्हणजे आजोबा.
त्यांना तुमच्या गुणांच,शाळेच्या प्रगतीच,भविष्याच्या डोलार्याच ओझं नसत.तो माणूस तुमच्या भावविश्वात येऊन जगत असतो.स्वच्छंदी.
तुम्ही एकदम आजोबा म्हणताना सरळ नावाने जरी हाक मारली तर तुम्हाला अहो जातो ने प्रतिसाद देणारा हा आपल्या आयुष्यातला अवलिया त्याच्या आयुष्यात नातवाला सर्वस्व सहजपणे अर्पण करतो.
आजीच सोवळ हा आजोबा नातवासाठी कस फाट्यावर मारतो हे मी फार जवळून पाहीलय ,अनुभवलय.
आजोबा आपली खरच सुरवात असतात आणि त्यांचा आपण शेवट असतो का ह्यापेक्षा नातवाच्या आगमनापासून फक्त नातूच श्वास असतो.
श्वास चित्रपटानंतर आजोबा आणि नातवाच्या रेशमासारख्या नात्यावर बोलणार्या मोजक्या चित्रपटापैकी पुष्पक विमान हा एक.
जरूर पहा!!!!
आजोबाच वयं वाढल ते काही गोष्टी विसरत जातात पण नातू तसाच त्यांच्या आयुष्यपटावर खेळत असतो नव्हे ते खेळवत असतात.
म्हणून चटका लावून गेल तरी नातू त्यांचा नकळतपणे शेवट असतोच आणि ते प्रत्यक्ष अनुभवण एक नकोशी जखम ..
आबासाठी..

प्रवास

किशोरची गाणी होती सोबत
वाट मागे सरत होती....
ऑटोच्या प्रवासात ती सोबत होती.
ठिकाण दर  ठिकाण ऑटो होता थांबत,
आणि मग लागलेल्या  दिव्यात
ती दिसत मला होती...
प्रवास सुरु होत असे  मग
आणि दिवे विझवी चालक तो..
गाण्यात गुंग मी ; तिला परत
पाहायला उतावीळ  मी जो..
कधी लागे "कभी कभी",
तर कधी "तुम बिन"..
उशिरा सोडलेल्या मॅनेजर चे
चुकवू  कसे मी ऋण..
लागले मधेच
"तेरा मुझसे है पेहले का नाता कोई"..
आणि आमच्यातला शेजारी असून
एकांत झाला जड डोई..
गर्दी कमी होत होती..
वाढत होती..
माणसं होती उतरत..
काही नवे लोक होती बसत ...
धडपड पाहून चालकाची,
 "कळी" ती हसली खुदकुन..
आणि मी पहिले त्या
बोलक्या डोळ्यात चमकून....
गर्दी होणारच आहे असच बसावं लागेल आपल्याला
म्हणाली ती हसत "मला"..
उगाच वाटलं मला ,
"आवडला अबोल सहवास माझा तिला"...
अशीच  गाणी बदलत होती ...
आणि तसच ती दूरवर,
 सोबत माझ्या येत होती..
उडणारे केस माझ्या चक्षुंवर स्पर्श करत होते..
काहीतरी मला जणू  खुणावत होते..
मधेच गाणी  झाली बंद
आणि हळूच उतरली ती ..
वाटलं तोडली जणू
कळी कुणीतरी ती..
लागलं गाणं परत
"कोई हमदम ना राहा" ..
आणि दिवा परत लागला,
बसलं "कुणीतरी" परत बाजूला..
आणि किशोरचा सूर परत.
"ये शाम मस्तानी "चा  लागला..
मग परत प्रवास झाला सुरु ..
बोलका एकांत परत सुरु...    
  (प्रवास माझाच आहे बरं का!!!)

एक सकाळ

गाढ झोपेतून जागा होऊन ताडकन उठून बसलो की लगेच चक्कर आली. माहीती होते जाग आली की लगेच असे ताडकन न उठता एका अडंगावर येऊन उठायचे असते. विचारच इ...