Wednesday 20 December 2017

फोटो

हा तुझा फोटो काढताना मी तिथे असतो तर त्या कॅमेर्यातून तुला न्याहाळत बसलो असतो..मला इतकं काही सुचल नसत कि इतक्या नीरागस चेहऱ्याकडे पाहण सोडून त्याचा फोटो काढत बसाव..तुला असं कुठेतरी विचारात हरवलेली पाहून मला मीच तुझ्यात हळूहळू हरवून बसलो असतो जणू पाण्यात साखर विरघळली अगदी तसं..
तुझ्या इवलूश्या डोळ्यामध्ये मी माझ्यासाठी खूप जागा शोधली असती कारण माझ्याशिवाय तेथे कुणी असावं असं मला
कधीच वाटलं नसत अगदी तुझ्या स्वप्नांना थोडं सरकवलं असत ..नाही असूदे त्यांना तिथे.त्यांच्यामुळेच तर तू आनंदी असणार ना..
त्या इवलुश्या दोन डोळ्यांमध्ये असणार ते नकट नाक..मला सतत त्या श्वासांचा हेवा वाटला असता कारण त्यांना तुझ्या हृदयात जायला मिळत आणि मी तो रस्ता शोधतच आहे अजूनही..
तुझ्या त्या मऊ गालांच्या लादीवर स्थिरावलेला हात मला अजिबात आवडला नसता..तो  कसा इतका जवळ येतो त्यांच्या हा.😡. मी त्याला तिथून हटवलं असत पण मग विचार केला कि असूदेत त्याला तिथे...तू तुझ्या निरागस चेहर्याचा भर त्याच्यावर लादून  तुझ्या विचारांना मुक्त केलं असत आणि मला तुला तसं पहायला खूप आवडत..
तू तुझे केस बांधून त्यांची वेणी  अशी मानेमागून समोर घरंघळत ठेवलीस ते पाहून तर मी इतका मोहित झालो असतो कि मी त्या केसांच्या गुंत्यात तुझ्या-माझ्या  प्रेमाचा गुंता  हळुवार सोडवला असता..आणि तू त्या वेणीसोबत जशी खेळतेस तसं माझा हात हातात घेऊन माझ्या बोटांशी  खेळावं असं वाटलं असत..
तू स्वतःभोवती जो  स्कार्फ गुंडाळला आहेस ते पाहून मला रडूच  आलं असत आणि  वाटलं असत अशीच तू माझ्या बाहुपाशात  आणि प्रेमाच्या स्पर्शाने मोहरून गेली असतीस तर..
पण हे  सगळं  मी तिथे असतो तरच  आहे का ??
माहित नाही 🧐🧐
पण माहित नाही तू 
आहेस का सुंदर??
गुलाबासारखी कोमल
चाफ्यासारखी बहरलेली
अन गुलमोहरासारखी मोहरलेली
माहित नाही  तू 
कशी  आहेस  ते ???
पण माहिती 
कुणासाठी तरी तू
सदैव फुलत राहणारी 

कळी आहेस..☺️

Sunday 10 December 2017

का बरं????

का बरं ? का असच होत ?
कातरवेळी च मी उदास होतो
भकास सगळं वैरण्य वाटत
तू असलीस कि ती मात्र
सांजवेळ मोगर्यासारखी बहरते..
का बरं ? का असच होत?
माझ्या पावसात भिजुन
आठवणींचा उमाळा त्याचा दाटे..
का बरं ? का असच होत?
तुला पाहून हरवाव म्हणतो
अन तुलाच हरवून बसतो..
का बरं ? का असच होत?
तु बाजूला असलीस कविता सुचते
तुला ते निसते सगळे क्रमीक वाटते..
का बरं ? का असच होत?
तु नाही बोलणार अन
मी विचारणार तेच
का बरं ? का असच होत?
              -ग्रेसाक्त(माझं नाव)

Monday 1 May 2017

एक मे मराठीचा

१ मे ची सकाळ झाली.गजर वाजला त्यातही गाणं लागलं "गर्जा महाराष्ट्र्र माझा "..
काही जण उठून तयार होऊन  पांढरेशुभ्र कपडे घालून ध्वजवंदनाला गेले.
विद्यार्थी निकालाच्या अपेक्षेने हाती उपेक्षा मिळते का ह्या घालमेलीत शाळेत हजर  झाली.
काही अजूनही अंथरुणात रेंगाळत  आहेत.
त्यांना आठवत नाही बहुतेक आज काय आहे ते?
पण आहे काय आज?
मलाही  आठवत नाही..काय तो संयुक्त महाराष्ट्र झाला होता ना.कितीतरी वर्ष पूर्ण झाली.
ज्ञानोबांपासून तुकोबांपर्यंत ,शिवबांपासून सावरकर ,टिळकांपर्यंत आणि खांडेकर,तेंडुलकरांपासून ते पाडगावकरपर्यंत आणि नेमाडेपर्यंत ह्या सगळ्यांनी जे काही योगदान दिलय आणि त्यासाठी  आपण कृतज्ञ व्हांव ही आपल्यात भावना जिवंत आहे का?
असं वाटत नाही का कि आपण सगळे (मी पण ) अशा प्रवाहात  आपली  नाव  हाकत आहोत जो प्रवाह आटणार आहे आणि  मग परिस्थिती अशी येईल कि नाव अडकेल आणि आपण चालणं  विसरलेले असू .
आपल्या  भाषेवर,आपल्या अस्मितेवर आपल्या संस्कृतीवर जीवापाड  प्रेम  करणे म्हणजे दुसऱ्यांच्या भाषेचा,अस्मितेचा तिरस्कार करणे नव्हे हे आपण साफ विसरलोय
भाषा टिकली तर सगळं काही  टिकत कारण ती एकच गोष्ट जी फार मोठा  दुआ आहे.
ज्ञानाच्या घड्यामधली आणि अज्ञानाच्या रित्या ओंझळीसाठी ती धार आहे ..
कल्पनाविलास आणि स्वप्न ह्यामधला समतोल राखायला शिकवणार अस्त्र आहे .
माझ्यामधल्या ' मी ' ला टिकवून ठेवणार शास्त्र आहे.
आणि गरजेप्रमाणे चवीसाठी लागणाऱ्या मिठासारखी अभिमान टिकवणारी आहे.
आपली अडचण ही आहे ना कि आपण आपली मूळे फार लवकर सोडतो.
असा महाराष्ट्रात माणूस नाही ज्याला हिंदी येत नाही.तरी काही लोक सरळ तोंडावर बोलतात "मराठी लोगों के दिल अच्छे नही होते?"
कुठे गेलाय तो स्वाभिमान??
दाक्षिणात्य लोक त्यांची भाषा सोडून कुठलीच भाषा बोलत नाहीत.हिंदीही नाही राष्ट्रभाषा असूनही.
(मी त्यांचा समर्थन करत नाहीये .ज्यांना मराठी येत नाही नवखे आहात त्यांच्याशी हव्या त्या भाषेत संवाद साधायलाच हवा)त्यांना तिथे जाऊन कुणी  काही बोलत नाही.
एवढ्यावर त्यांना उत्तर काय  देतो आपण "नही सभी लोग बुरे नही है "..
म्हणून मी त्यांना मारत  बसायचं किंवा हुस्कावायचं असं माझं म्हणणं नाही.
दोन मराठी लोक उगाच विनाकारण मराठी सोडून सगळ्या जगाच्या भाषेत गप्पा मारताना  मी पाहिलंय ,म्हणलं तर सवय झाली असं त्यांचं म्हणणं असत.
किती मोठी शोकांतिका आहे ही...
हतबल झालोय आपण.गुडघे इतके झुकलेत कशाच्या भाराने माहित नाही पण आता ताठ उभं राहता येईल का ह्यावर आपणच आपल्यावर आश्वस्त नाही आहोत.
पण आपल्या भाषेचा आदर करायला लोकांना आपणच शिकवायला हवं ना..
आम्ही शाळेत गेलेलो त्या शाळेत काही लोक येतात मुलांना इंग्लिश शिकवायला.का तर म्हणे स्पर्धेत टिकावीत.मी सहज मुलांना विचारलं १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी (हे महिने ही नाही आवडत खरं तर असो )ह्या दिवशी काय आहे?ती मुलं ४ थी मधली होती म्हणून म्हणलं महाराजांचा इतिहास असेल सांगा बरं शिवाजी महाराजांचा जन्म कधी ,कुठे झाला?
फार तर दोघा-तिघांनी उत्तर दिली..
ह्या इंग्लिश शिकवायला जाणाऱ्या मंडळींना कळत नाही का कि विकास ,जडणघडण ही भाषा शिकवून नाही तर जी भाषा उमगते,ज्या भाषेत स्वप्न पडतात त्या भाषेत शिकवल्याने,ज्ञान दिल्याने होते.
मराठी शाळेच्या अवस्थेला ना सरकार जबाबदार आहे ना शिक्षक मग ते कसे ही असो.
जबाबदार ती पालक आहेत ज्यांना  स्पर्धा नावाच्या विस्मयकारक वाटणाऱ्या पण आभासी अशा मैदानावर गाढवं पळावयाची आहेत.
चिन्मयी राघवनला एका कार्यक्रमात विचारलं गेलं कि तुझे मुलं मराठी शाळेत शिकतात ?
खरं तर हा प्रश्न किती अयोय आहे.तिने सांगितलं "मुलांना भावविश्वाशी जोडणारी कविता मला माझ्या भाषेत मिळेल.बाहेर पडलं तर त्यांना गवतफुल काय असत दिसेल.इतका छान वारसा जो लाभलाय तो त्यांना देणं आणि त्याचा मनमुराद आनंद घेऊ देऊन ते अनुभवू देणं आपलं कर्तव्य आहे."
किती समर्पक उत्तर आहे.
माझी मुले  मराठी शाळेत जातात हे एखाद्या पालकाला सांगायला  लागण तेही महाराष्ट्रात राहून,मराठी असून हे किती लाज वाटण्यासारखं आहे.
बरं स्पर्धा  नामक गोष्ट काय हे माहिती नसताना काही दिड शहाणे बाजूच्याने कोणत्या शाळेत टाकलं मग मी ह्या शाळेत टाकेल ह्या अविर्भावात असतात.
आणि काही ' शाळांची अवस्था ' कारण देऊन सुटतात आणि काही लोक त्याच मराठी शाळेचे शिक्षक असतात..
नाही ना अवस्था शाळेची चांगली मग थोडं व्हा ना जबाबदार..मोर्चा काढा थोडा संवाद साधा.दुसऱ्या भाषेच्या शाळेत टाकलं  तेव्हा करताच ना आणि घरी अभ्यासही घेताच ना..पण मराठी साठी असं करणार नाही आणि दुसरया माध्यमात टाकणार कारण  शेवटी काही जणांचं स्टेटस (प्रतिष्ठा) मधे येत.
शेवटी सगळ्यात महत्वाचं विसरतो ते सर्वांगीण विकास..
मातृभाषेत शिक्षण झालेल्या मुलांची जडणघडण उत्तम होते हे स्पष्ट झालंय.
सगळं आपणच ठरवून मोकळे होतो .त्याला निसर्गाचे ना राग ना अंग दिसतात ,ना भाव दिसतात ना रूप.
त्याचे किती मार्ग तुम्ही नकळत बंद करता.त्याच्या आवडी त्याला कळण्याआधीच मारल्या जातात.
त्याला त्याच भावविश्व योग्य वयात नही मिळालं तर त्याच्या  स्वप्नांचे ,आकांक्षाचे झोके उंच कसे उडतील?
पंखांना बळ कस  मिळणार ?
अंगाईगीत असो व बडबड गीत ,भक्तीगीत असो व भावगीत ह्या सगळ्यातून होणारे नकळत अविरतपणे होणार संस्कार कसे होतील?
ह्या सगळ्यांची उत्तरे शोधण्यापेक्षा तुम्हाला माझी बडबड वाटेल वाटू देत तरी विचार कराच.
पण झुकली मान,वाकला कणा आणि गळालेला स्वाभिमान घेऊन जगायचं तरी किती दिवस हे विचारूया स्वतःला..
आपण करतो का आपल्या नाटकांवर,चित्रपटांवर प्रेम?
आपण सतत कुणाकडे काही तरी आहे जे आपल्याकडे नाही  ह्यावर टिवल्या-बावल्या करत असतो पण आपण आपल्याकडे जे आहे ते कुणाकडेच नाही ह्याचा विचार नाही करत किंवा आपणांस जाणीवही नाही कारण बालपण जर दुसरया अंगणात गेलं तर स्वतःच्या अंगणातला पारिजातही सुगंधी वाटत नाही.
अडचण तिथे निर्माण होत नाही जिथे आपण मराठी न येणाऱ्या माणसाला हिंदी बोलतो तिथे होते जेव्हा २० वर्षांपासून इथे राहणाऱ्या माणसाशी आपण त्याच्या भाषेत गप्पा मारत बसतो हे किती संयुक्तीक आहे?

छोटा भीम दाखवताना इसापनीतीच्या कथाही ऐकवाव्यात.भीती ही निर्माण होतीये कि बोनापार्ट वाचता वाचता माझा शिवबा काळाच्या ओघात वाहून जाऊ नये..
मी हे सगळं काही पालकांना उद्देशून नाही म्हणत आहे.मला आणि सगळ्या मराठी जणांना म्हणतोय.
कारण शेवटी येणाऱ्या पिढीने काय संगठीत केले आहे  जेणेकरून त्यांचा संचय अभिमानास्पद  वाटावा  हे आपण ठरवायचं आहे ..
इतिहासातले स्थान असो व भविष्यातले अस्तित्व .हे मोठया बंगल्या आणि सोन्याच्या बंगईने नाही टिकत..ते टिकत तुम्ही केलेल्या सांस्कृतिक विकासावरून.वारसाने मिळालेल्या  ठेव्याला  अवीट गोड ठेवा म्हणून प्राशान  केल्याने.

भाषा कोणतीच वाईट नाही पण माझं तेज आधी माझ्या मातृभूमीचा अंधार दूर करून मग दुसऱ्याची मायभूमी उजळीत करेल इतकी कृतज्ञता शिकवावी पिढीला एवढीच माफक अपेक्षा..
आपली माय मराठी काहीतरी सांगत आहे ऐकू या..


 " कुणीतरी बोला रे माझ्याशी ||

मला कळते त्या भाषेत बोला रे
मला माझ्या  गतवैभवाची दिवस आठवू द्या रे
मला माझ्या ह्या भूमीवर जगू द्या रे
कुणीतरी बोला रे माझ्याशी ||

मी ओळखते ह्या कड्यांना
मी ओळखते ह्या नद्यांना
मी जपते  ह्या इतिहासाला
मी ओळखते रे ह्या महारष्ट्र देशाला
 कुणीतरी बोला रे माझ्याशी ||

मला श्वास घेऊ द्या रे
मला ही कुणीतरी ओळखा रे
 कुणीतरी बोला रे माझ्याशी

कुणीतरी बोला रे माझ्याशी ||"






नवरात्रातील कीर्तनांचे सार

 माझ्या गावात मुदखेडमधे श्री कालेजी देवी (मूळ स्थान माहूर) मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव खूप उत्साहात साजरा करतात. कीर्तन , भजन आणि असे असंख्...