Tuesday 14 November 2023

नवरात्रातील कीर्तनांचे सार

 माझ्या गावात मुदखेडमधे श्री कालेजी देवी (मूळ स्थान माहूर) मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव खूप उत्साहात साजरा करतात. कीर्तन , भजन आणि असे असंख्य उपक्रम राबवतात. जे कीर्तन ऐकण्याचा योग आला त्या कीर्तनांचा सार लिहीण्याचा प्रयत्न केला आहे.

*अश्विन शुध्द तृतीयेला झालेल्या कीर्तनाचे सार..*


कीर्तनकार : ह.भ.प. विक्रमजी नांदेडकर 

आपला एकच धर्म आहे ज्यात ज्ञानोबा माऊली जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात म्हणू शकतात.परंतू धर्माने दिलेली सुविधा आणि सूटचा अतिरेक धर्म विमुख कार्य करण्याचे प्रमाणपत्र नसते हे आपल्याला कळायला हवे .

विकार युक्त मन आणि व्याधी ग्रस्त देह हे समान आहेत पण देहाचे उपचार वैद्य करू शकतील पण मनाचे उपचार आपली सद्गविवेक बुध्दी आणि विकारहीन मनाने भगवंताचे नामस्मरण यानेच होऊ शकतात.

संतांच्या चरित्रात कारूण्य असूनही सुख, समाधान आणि भगवंताचे अधिष्ठान आहे आणि आपल्याला त्यांच्या तुलनेत सुख असूनही आचरणात , बोलण्यात कारूण्यच असते. 

आपले आचरण धर्मसंगत होईल, ग्रंथ वाचण्यापेक्षा जास्त त्यांच आचरण जास्त होईल तेव्हा आपण देवाला आपल्या जवळ घेऊन येऊ.

केशवसुतांची कविता आहे ,त्यातल्या चार ओळी .

“सदा पद्य घोकोनियां शीण येतो

सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ॥

खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ “

*अश्विन शुध्द चतुर्थीला झालेल्या कीर्तनाचे सार…*

कीर्तनकार : ह.भ.प. रामकृष्ण महाराज जामकर

करून करून भागले आणि देवपूजेस लागले आपण असे साधारण म्हणत असतो. सामान्य मनूष्याच्या आयुष्याचा भागच पैसे कमावून, सुख मिळवून मग भगवंताच्या चरणी लीन व्हावे ह्या गृहितकावर आधारित असतो. पण आयुष्याच्या कोणत्याही आश्रमात भगवंत स्मरण हे लागतेच. भगवंताचे स्मरण म्हणजेच स्वतःच्या रूपाला , स्वतःच्या जन्माचे कारण कळणे हाच होय. संत मीराबाईंचे चरित्रातून आपल्याला हेच शिकायला मिळते .

स्वतःच्या सत्वाला ओळखणे हाच खरा मोक्ष होय आणि ह्याला प्राप्त करायला  भगवंताचे स्मरण हा उपाय होय. द्वैताकडून अद्वैताकडू जाण्याचा प्रवास म्हणजेच स्वतःमधील भगवंताला शोधणे होय. रामदास स्वामींच्या ओळी इथे सार्थ ठरतात.


जनीं सर्वसूखी असा कोण आहे।

विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥

मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।

तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥

*अश्विन शुध्द पंचमीला झालेल्या कीर्तनाचे सार..*


कीर्तनकार : ह.भ.प. अवधूत महाराज टाकळीकर


हिंदू धर्मात चार आश्रम, चार पुरूषार्थ आणि सोळा संस्कार असून ह्या सर्वांना बांधणार दुवा कोणता असेल तर ते म्हणजे तुमचे कर्म.

जसे क्रियेविन वाचळता व्यर्थ आहे अशी म्हण आहे म्हणजेच फक्त बोलून दाखवण्यापेक्षा कृती करावी असा अर्थ होतो तसेच कर्मेविना जन्म व्यर्थ होय असेच म्हणावे लागेल. कर्म जसे असेल तसे भोग, तसे फळ तर मिळतेच.

आयुष्याचे संचित काय असेल तर ते तुमचे कर्म होय. मनुष्याने परमेश्वाराचे चिंतन करावेच पण कधी तरी निवांत बसून आपल्याच चालू आयुष्यातील कर्मांचे चिंतन करणे ही कर्मप्राप्त आहे. कर्माचे चिंतन हाच संसरीक ते ऐहीक ह्या प्रवासाचा दुवा म्हंटले तरी वावगे ठरणार नाही . कर्माचे चिंतन हाच आनंदाचा मार्ग होय. समर्थ सांगतात तसे


मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते।

अकस्मात होणार होऊनि जाते॥

घडें भोगणे सर्वही कर्मयोगे।

मतीमंद तें खेद मानी वियोगें ॥


- संजीत चौधरी 

नवरात्रातील कीर्तनांचे सार

 माझ्या गावात मुदखेडमधे श्री कालेजी देवी (मूळ स्थान माहूर) मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव खूप उत्साहात साजरा करतात. कीर्तन , भजन आणि असे असंख्...