Sunday 24 June 2018

आठवणीतला पंचम :कॅस्सेट्स ते सारेगम कारवां

संध्याकाळची वेळ.ऊन उतरलेलं,आपापली कामे आटपून सगळी गल्ली ओट्यावर बसलेली असायची आणि आमच्या घरातून किशोरचा आवाज ऐकू येई आणि हळूहळू सगळी मंडळी आमच्या ओट्यावर येऊ लागत.
कॅसेटस बदलत असत.A side वरून B side होत असे.किशोर वरून रफी,मन्नाडे वरून कुमार सानू होई,पण एक व्यक्ती क्वचितच बदलला.ज्याने संगीताला किती बदलल,वेगळी कोणती दिशा दिली ह्यापेक्षा त्याने संगीत किती जणांना अनुभवयाला लावल हा तो माणूस.
मोठं कपाळ,बोलके डोळे आणि तितकच त्याच्या व्यक्तिमत्वाची छाप पडणारा जाडसर काड्यांचा चष्मा आणि त्यावर टोपी.महान संगीतकारांच्या पंक्तीमध्ये स्वत:साठी अलगद पण फार मोठी अशी ध्रुवताऱ्यासारखी जागा  निर्माण केलेल अतुलनीय व्यक्तिमत्व.राहूल देव बर्मन..तीन दिवसांनी ह्या अवलियाचा वाढदिवस.
घरातूनच संगीताचं वरदान मिळालेला हा माणूस जन्म गाणे(रडणे ) सारेगमप मध्ये गात असल्याने त्याच्या वडिलांनी सचिनदानी यांचं टोपणनाव पंचम ठेवल.अजूनही बरेचसे किस्से आहेत या नावाचे.
अशा सुरेल माणसाने संगीताचे गुणग्रहण वडिलांपासून सुरु करून मग ह्यां"अली अकबर खान " आणि "समता प्रसाद " दिग्गजांकडून घेतले.सलील चौधरीला पंचम  गुरु मानत.ह्या शिक्षणाच्या  प्रवासातून स्वतःच्या अशा एका वेगळ्या  शैलीच जाळ विणायला ह्याने सुरू केलं.खरे तर या जाळ्याची सुरवात तेव्हाच झाली जेव्हा सचिनदानी फंटूश चित्रपटासाठी पंचमनी केलेली लहानपणीची धून वापरली होती.पंचमचा पहिला स्वतंत्र चित्रपट हा "राज" होता जो प्रदर्शित झालाच नाही."छोटे नवाब" हा पंचमचा प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट जो "मेहमूद" सोबतचा होता आणि  मग ह्या जोडीने जो काही दंगा केलाय तो लाजवाब आहे.

"तिसरी मंझिल" हा चित्रपट आहे ज्याने पंचमला खरं यश चाखायला लावल.सगळी गाणी बेफाम चालली.
अभिनेता "शम्मी कपूर "म्हणलं कि आवाज रफी आणि संगीत "शंकर जयकिशन" अस होत.मजरूह सुलतानपुरीमुळे पंचम ला हा चित्रपट मिळाला पण शम्मी काही ऐकायला तयार नव्हता.शंकर जयकिशन वर अडून बसलेला पण पंचम ने हे शिवधनुष्या लीलया पेललं आणि गाणी बेफाम चालावी.
"सचिनदा" आराधनाचे गाणे मुद्रित करताना आजारी पडले आणि जबाबदारी येऊन पडली त्यांना साहाय्य करणार्या पंचमवर,ह्याआधी असच साहाय्य करताना स्वतःच्या आग्रहास्तव "प्यार का मौसम"मधे किशोरकडून "तुम बिन" हे गाणं गाऊन घेतलं होत तेही यॉडलिंग सहित जो प्रकार भारतीय संगीत जगताला अगदी नवीन होता. आणि नेमकं हेच त्याने आराधना च्या वेळेस केलं.किशोरला बॊलावून जवळपास सगळीच गाणी त्याच्याकडून गाऊन घेतली आणि तिथेच ह्या द्वयीचा उदय झाला.
पुढे हे समीकरण लोणच्यासारखं मुरात गेलं आणि तितकंच चविष्ट बनत गेलं.
अजून एका माणसासोबत ह्याचा मुरंबा होता."गुलजार".ह्या नात्याविषयी लिहायला शब्द कमी आणि लय अपुरी पडेल.अजूनही धुक्यातून गुलजार पंचांची वाट पाहत असतात.
पंचम वर असा आरोप होतो कि त्याने किशोर ला झुकत माप दिल.कमी प्रमाणात ते सत्य असाल तरी "हम किसीसे कम नही" मधल  गाणं अाठवा "क्या हुआ तेरा वादा" जे रफीने गायलं आहे.रफी त्या गाण्याच्या वेळेस पूर्णपणे खचलेला होता त्याला धीर देऊन हे गाणं गाऊन घेणारा पंचमच होता आणि तेच गाणं जास्त गाजलं.
पंचम हा काही फक्त पॉप किंवा यॉडलिंग पुरता मर्यादित नव्हता.कुठे राजेश हेलनच ते "दुनिया मै लोगो को"आणि कुठे "परिचय" मधल क्लासिकल गाणं "बीती ना बीताई  रैना".आंधी मधलं "तेरा बिना जिंदगी से" असो वा "चुरा लिया है तुमने जो  दिल को" असो हि सगळी वेगळ्या वाटेवरची एकाच झाडाची वेगवेगळी फुले आहेत.
पंचमला फक्त संगीत आणि संगीतच दिसत असे.ह्या वेडापायी तो इतका अस्वस्थ असे कि चहा थंड होण्याची वाट पाहत नसे पण पाणी टाकून पिऊन टाके.ह्याच वेडापायी त्याने वस्तूंमधून सूर काढले.
अशा हुरहुन्नरी माणसाचा उत्तरार्ध मात्र तितकासा चांगला नव्हता .आपले म्हणणारे साथ सोडत होते.त्यातही त्याने वर्तमानपत्रातल्या बातमीप्रमाणे भासणाऱ्या शब्दांच सुंदर गाणं केलं आणि बक्षीस मात्र गायक आणि गीतकाराला मिळाले.
पण हरेल तो पंचम नव्हे.शेवटच्या चेंडूवर त्याने छक्का  मारूनच संगीत रंगभूमी सोडली."१९४२ लव्हस्टोरी". पण हे यश न पाहताच तो गेला.प्रत्येक गाणं मोती आणि प्रत्येक चाल स्वर्गीय वाटावी अशी अन हृदयात खोलवर जाऊन मुरणारी.
तो ज्या लोकांसोबत काम करायचा त्यांची किती काळजी करायचा हे त्यांच्या ओघळणाऱ्या अश्रुंवरून कळून येत.स्वतःच्या पैशानी गाण्यांचं रेकॉर्डिंग करणारा खरा संगीतप्रेमी.आज दिसत नसेलही पण आपल्यात आहे.तो सतत प्रवास करतोय.एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे.एका संगीतकाराकडून दुसऱ्या संगीतकाराकडे ."कॅस्सेट्स" कडून "सारेगम कारवां" कडे. त्याने दिलेलं ओंझळीत मावेल तितकं घ्यायचं आणि बस्स त्याच्यासोब गुणगुणायच..
"मुसाफ़िर हूँ मैं यारों
ना घर है ना ठिकाना
मुझे चलते जाना है, बस, चलते जाना
एक राह रुक गई, तो और जुड़ गई
मैं मुड़ा तो साथ-साथ, राह मुड़ गई
हवा के परों पे, मेरा आशियाना"
वाढदिवसाच्या हार्दिक अधिक आणि आधीच  शुभेच्छा पंचम..

नवरात्रातील कीर्तनांचे सार

 माझ्या गावात मुदखेडमधे श्री कालेजी देवी (मूळ स्थान माहूर) मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव खूप उत्साहात साजरा करतात. कीर्तन , भजन आणि असे असंख्...