Wednesday 28 March 2018

ग्रेस

रेडिओ जवळ बसून "शुक्रतारा "लागण्याची  वाट पाहत होतो.तरुण रक्त,भाव गीतांचा वेड अन त्यात पाडगावकर..रेडिओ आईमुळे ऐकण्याची सवय होती.एक गाणं लागलं.दोन  ओळी ऐकल्या की कळलं पंडित मंगेशकरांचा आवाज आहे.जस जस गाणं पुढे सरकत होत तस तस मी स्वतःला विसरत चाललो होतो.
रेडिओ म्हणजे हरवलेली प्रेयसी भेटली आहे ह्या अविर्भावात त्याच्या कडे पाहत होतो.
ते गाणं होत ,"ती गेली ,तेव्हा रिमझिम ".तेव्हापासून मी जो काही ग्रेसच्या अगम्यतेत वहावत गेलो आहे ते आजतागायत डुबून जिवंत आहे.
ह्या अवलियाचा २६ मार्च ह्या दिनी स्मृतिदिन."माणिक सीताराम गोडघाटे".
इन्ग्रिड बर्गमन चा चित्रपट पाहून तिच्या ग्रेसवर मोहून ह्यांनी आम्हाला आमच्या जाणिवांना,नेणिवांना आकार देणाराग्रेसदिला.
ह्यांच्या कविता कळाव्यात म्हणून वाचणाऱ्याला ग्रेस कधीच कळणार नाहीत.
एकाच कवितेमध्ये निसर्गाला,जाणिवांना वळणे घालून हा माणूस तुम्हाला सजीवांच्या प्रेमात पाडेल,विरहात भिजवेल किंवा मग अस्वस्थतेच्या रानात नेऊन सोडेल.करा आता विहार तुम्ही.
आणि आपण वाचक म्हणून अर्थ शोधावा;फक्त तो  वैश्विक किंवा प्रस्थापित कवींसारखा कळता असावा हि अपेक्षा नको.
सायंकाळी फक्त सूर्यच जाणं, वारेसाच हळुवारपणे वहाण ,समईच मंद तेवत असण अनुभवायचं असत बस्स.
संध्याकाळच्या कवितामी कितीदा वाचला आहे ,सोबतच असतो.तसच काहीसमितवा आहे.
स्मृतिगंधही कविता सतत माझ्या मनात रुंजी घालत असते.
           "तू उदास मी उदास मेघही उदासले"
           "स्मृतीतले विदग्ध नाद पैंजणात सांडावे"
ह्या दोन ओळीवरच माझी स्वारी कित्येक दिवस रेंगाळत होती.ती अजूनही तिथेच अडकून समोर जाते.
आज ग्रेस सोबत नाहीत आपल्या आणि ह्या दोन ओळी स्वतःसाठीच लिहून ठेवल्या असच वाटत.(आपल्याकडून त्यांच्यासाठी).
ग्रेसची राजकीय ,सामाजिक भूमिका फार मोठी,दखलपात्र नसेल किंवा फार नाहीच पण काही बाबी आहेत ज्या त्यांचे समाजाभिमुख संवेदनशील मन सांगून जातात.
ते म्हणतात कलाकार हा समाजशील असतो पण समाजधार्जिणा नसतो.
काय सुचवायचं असेल ?
सडेतोडपणे म्हणतात “An Artist is not Special Kind of Man and Every man is Special kind of Artist “हे साफ खोटं आहे.उगाच बर वाटाव म्हणून का?आणि कुणाला?सर्वसामान्यांना?
त्यांना हे अति आत्मसंतुष्टीचं द्योतक वाटत असणार.त्यांच आपल सरळ असत,”An Artist is differently thousand times special kind of Man”.कलाकाराच समाजावर प्रेम असत.कलाकार हा समाजशील असतो पण समाजधार्जिणा नसतो.
काय सुचवायचं असेल ?
जी..कुलकर्णींच्या आठवणीतल्या कार्यक्रमात म्हणाले कि माझ्या दंतकथा आहेत आणि त्यामुळे मला लोक घाबरतात.माझ्याकडे शस्त्र नाही,राजकीय पालखीचं ओझं नाही ,मी गुंडा नाही तरी हे घाबरणं म्हणजे ,”It is the best possible type of lerical attitude I am getting from my wonderful Readers.”
आहे का दुःख,तक्रार नाही ना.रडगाऱ्हाण नाही.
मी कलाकार असून माझी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नाही कि वेड्याच्या इस्पितळात नोंद नाही ह्यापेक्षा अजून काय सामाजिक कार्य अपेक्षित आहे.”
राहून  राहून वाटत हाच तर तो समाजशील आणि समाजधार्जिणा फरक तर नाही ना.
ग्रेसांनी सांगितलेला पुरुषार्थाचा अर्थ किती गर्भित समाजाभिमुख आहे ते जाणवत आणि कलाकार निश्चितपणे समाजाला बांधलेला असतो ह्याची जाणीव झाली."आजच्या आधुनिक काळातली बाईपर्यंतच्या सर्व विकासाची परिवर्तने सृजनशीलतेच्या दिशेतून तपासून पाहणे हीच माझ्या पुरुष असण्याच्या पुरुषार्थाची व्याख्या होय"
ज्यांना कुणाला पुरुषार्थाचा गर्व/माज आहे त्यांनी ही ओळ मनावर कोरावी.
मला आजही त्यांची कविता त्रासदायक एकांतातून ,अपेक्षांच्या जाळ्यातून आणि ऊतू जाणाऱ्या प्रेमाच्या डोहातून अलगद उचलून बाहेर आणते.
कुणाला फार बोलायची सांगायची गरज लागत नाही.
      "ज्याचे त्याने घ्यावे,ओंजळीत पाणी,"
       “कुणासाठी कुणी थांबू नये"
ग्रेसला यायला सायंकाळ लागत नाही.ते मनात आले कि सायंकाळ होते.
जमेल तस बोलतो आम्ही.सगळंच कळत असं नाही पण दुर्बोध नक्कीच नसत.
राहून राहून वाटत ग्रेसच साहित्य जागतिक स्तरावर पोहोचावं.जग ग्रेस-वेडाने पछाडून जावं.
त्यांच लिखाण वाचून एक कलाकार म्हणून त्यांची किती झीज झाली असेल नाही पण हे हि ते आधीच म्हणून गेले "की कवीचे जगणे आणि त्याचे तथाकथित लिखणे  ह्यातून त्याच्या शरीराची आणि तितकीच  त्याच्या आत्म्याची झीज होत असते.काही वेळा स्फोट वा आघात इतके जबरदस्त असतात कि त्याचे तुकडेही पडतात आणि ते तुकडे अथवा झीज पुन्हा जोडता येत नाहीत"
असेच असंख्य तुकडे आणि झीज घेऊन ग्रेस आपल्यातून निघून गेला .
ग्रेस,मला तुम्हाला भेटून मला कळलेला तुमच्या कवितेचा अर्थ सांगायचा होता.माझी एखादी कविता ऐकवायची होती.
तुम्ही साधत असलेला एकांताशी संवाद ऐकायचा होता.
तुम्ही कुठे आहात नाही माहिती रोज ती सांयकाळी झुळूक "ग्रेस"च्या कवितेची स्पंदने अंतरंगात फुलवते.
मी इतका नक्कीच मोठा नाही कि तुमचे आभार मानावे पण तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचे ऋण माझ्यावर नक्कीच आहे आणि त्यासाठी मी देवाचा नक्कीच शतजन्मी आभारी असेन.
त्याच संध्याकाळच्या करंगळीला धरून,मावळतीच्या सूर्याला पाहून,मंद प्रकाश आणि त्यात तेवणारी त्या वातीला पाहून तुमच्या स्मृतिदिनी मी काही शब्द सुमने तुमच्या चरणी अर्पण करत आहे ती मानून घ्यावी.(त्यांना सुगंध नसेल त्यांना रूप नसेल पण ती नक्कीच फुलली तुमच्यासाठीच आहेत)
     “एक तो दिवस असतो आणि एक ती रात्र
     आणि मग त्यांना सांधणारी असते तुझी          
     सांयकाळ..
     असो उठलेले काहूर विचारांचे वा
     उठली असो भावनांची मनात राळ..
     असो कुठले स्थान असो कुठले गाव.
     असो सोबत कुणी माझ्या
     रंक अथवा राव..
     ती असेल लाडकी तुझी
     सतत माझ्यासोबत.
    "ग्रेस" सांगू काय तुला
    काव्याने तुझ्या केले
    काय आमच्यासोबत.
    शब्दांची बाग तुझी
    वा गाण्यांची चाल
    तोच काय आमचा वारसा
    उद्या ,आज आणि काल..”

               -ग्रेसाक्त

नवरात्रातील कीर्तनांचे सार

 माझ्या गावात मुदखेडमधे श्री कालेजी देवी (मूळ स्थान माहूर) मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव खूप उत्साहात साजरा करतात. कीर्तन , भजन आणि असे असंख्...