Saturday 11 April 2020

अनंताचे फुल

आपण प्रवास करत असताना एखादे झाड, एखादं घर आपल्याला आपलं वाटून जात. वाटतं ह्याचा आणि माझा संबंध फार जवळचा आहे .घट्ट ऋणानुबंध आहे. काही घटना आपल्या आयुष्यात आधी घडून गेल्यासारख्या वाटतात त्या सगळ्या प्रकाराला  देजावू म्हटलं जात. पण जेव्हा एखादी वस्तू , एखादं झाड पाहिल्या-पाहिल्या त्याचा ऋणानुबंध जाणवतो त्याला काय म्हणणार आपण ?
 मला वाटतं उत्तर आपल्या संवेदनशील मनात आणि त्यावर झालेल्या  जडणघडणीमधे आहे. निसर्गाच्या सानिध्यात वाढलेल्या माणसाला सिमेंटच्या शहरात छोटंसं रोपट पाहूनही सकारात्मक वाटतं. श्रीमंत माणसाला एखादी नवीन कार पाहून सकारात्मक वाटत असेल .
        आपल्या आवडीनिवडी ,आपल्याला लाभलेला सहवास ह्या सगळ्या गोष्टी समोर येणाऱ्या वस्तूशी आपला आगंतूक संबंध सोडून जातात. तसाच संबंध माणसांशी देखील  जोडला जातो.अनोळखी शहरात गाडीची नंबर प्लेट MH_२६ पाहीली की आम्हा नांदेडकरांचा उर उचंबळून येतो. विदर्भाच पिठलं जिथे मिळत कळलं की  वऱ्हाडी पोरं तिथे धूम ठोकतात. समोरच्या माणसाची एक सवय त्या माणसाला आपल्या हृदयाची  वेगळी जागा देऊन टाकते. ती सवय माणसाच्या रंगरूप, देखणेपणा या सर्वांच्या निरपेक्ष असते . प्रेमाचा ,आपुलकीचा अंकुर फुटायला या आगंतूक परिचयाचा आधारही महत्त्वाचा असतो. "द. मा. धामणस्कर" ह्यांनी याचे यथार्थ वर्णन फार सुंदर  ओळींनी केलेले आहे.


                          "  तुझ्या केसात
                अनंताचे फूल आहे म्हणजे
                तुझ्याही अंगणात अनंताचे
                झाड आहे, ह्या जाणिवेने मी
                मोहरुन जातो.
                नावगाव माहीत नसतानाही तुझे, आपल्यात
                एक तरल संबंध रुजून
               आलेला मी पाहतो…"


 तू तुझ्या लांब केसात अनंताचे फुल माळतेस.( तुम्हाला जे आवडतं, तुम्हाला आवडणाऱ्या मुलींने जे फुल माळले ते घ्या)
तू माळतच आहेस तर मी असं समजून घेतो , तुझ्या घरात अनंताचे झाड आहे. त्या झाडाला तू प्रेमाने वाढवले आहेसं , जोपासत आहेस .त्याचा गंध तुला मोहित करतो. तुझ्या चेहऱ्यावर असणाऱ्या ताजेपणाचे कारण ते अनंताचे  झाड आणि त्याच्या प्रती असलेले तुझे प्रेम आहे. तुला त्या झाडाविषयी, फुलांविषयी, निसर्गाविषयी ममत्व आहे. सृष्टी सौंदर्याची लोचने म्हणून अनंताचे झाड, तू तुझ्या अंगणात वाढवले आहेस.
           तुझे अंगण  किती मोठे किती लहान आहे हे मला माहित नाही पण; तु त्या अनंताला वाढवले आहेस हे खूप आहे.फक्त तुला पाहून आणि त्या सुंदर फुलाला तुझ्या लांब वेणीत माळलेले पाहून  मला आपल्यात एकत्र संबंध रूजतोय हा विचार ,हा अनुभवही मोहरून टाकतो आहे.  ह्यावेळी मला तुझे नाव- गाव  काहीही माहित नाही,  पण तू आता अनोळखी नाहीस हे मात्र खरे.
         किती निष्पाप आणि निर्वाज्य भावनेने धामणस्कर ह्यांनी मानवी स्वभाव उलगडला आहे.मानव म्हणून आपण सतत प्रेम, आपुलकी शोधत असतो.आपण आपल्या सारखी माणसे शोधत असतो.आणि आवडी,जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ,घडणाऱ्या आणि घडवणाऱ्या गोष्टींचा परिणाम आणि त्याविषयी मत हे जुळून आले तर प्रेमाचा अंकुर नकळत फुटतो.
         गुलाबाच्या काट्याचाही विचार करणारे आगंतूक एकत्र येऊन फुलबाग फुलवतात तेव्हा ती तरलता मोहून टाकणारी असतेच.

नवरात्रातील कीर्तनांचे सार

 माझ्या गावात मुदखेडमधे श्री कालेजी देवी (मूळ स्थान माहूर) मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव खूप उत्साहात साजरा करतात. कीर्तन , भजन आणि असे असंख्...