Thursday 6 December 2018

बडी सुनी सुनी है

हे गाण सुरू होत आणि जया बाधूरी रेडिओ शोधत असते.मग तिला कळत की कुणीतरी हे गाण म्हणत आहे.खिडकीजवळ उभी राहून ती ते गाण ऐकत असते.अन हे गाण अमिताभ कॅसेटवर लावून ऐकत असतो.
हृषिकेशदा नी हे चित्रण जे दाखवल आहे ते अप्रतिम आहे.माणूस हा दु:ख ,आठवणी ह्यापासून लांब जायला मद्याचा आधार घेतो.इथे अमिताभ
हातात व्हिस्कीचा पेला धरून येरझारा मारत असतो.खुर्चीवर बसून घोट घोट प्राशान करून गाण्यांच्या सुरणांना सोबत घेऊन जणू आठवणींच्या बुचक्याच्या गाठी सोडतोय.
मद्याला कुरवाळत स्वत:लाच स्वत:शी (त्या जुन्या)
भेट घालून देतोय.
गाण्याची सुरवातच अमिताभच्या मानसिकतेच,
त्याच्या स्वत:वरच्या नाराजीच ,हळव्या पदराच दर्शन घडवत.
गाण्याच सौंदर्य दोन गोष्टीमुळे फार उठून दिसत.
एक किशोर चा धीरगंभीर आवाज (मजरूह सुल्तानपुरी चे शब्द अन सचिनदानी संगीत भुरळ पाडणार..)अन दुसर कलाकारांचा अभिनय.
हे गाण लिप्सिंग नसून कुठेच बटबट वाटत नाही.
सुंदर हसर्या फुलाची जणू हळूच उदास झालेल्या
फांदीशी ओळख करून देणार हे गीत..
मिली हा चित्रपट हृषिकेशदा च्या नभांगणातला अनमोल तारा आहे..
                       

गुलज़ार !!!


काही नाही हा...इतकं काही चांगलं नाहीये गाणं..
काही काय लिहिलंय..
असा कधीच ह्या गीतकाराबद्दल वाटलं नाही खरं तर असं फार कमी लोकांबद्दल वाटत..
टागोरांनापसुन प्रभावित झालेल्या ह्या माणसाने किती तरी लोकांना वेड लावलाय..
उर्दू कळत नसली तरी  गुलज़ारने लिहलंय म्हणजे अफाट काहीतरी असेल म्हणून सतत वाचायचं तेच ते
संदर्भ शोधायचे आणि मग ते सगळं एका घोटात प्राषण...
सगळंच पचत असं नाही पण वेगळी भूक लागते नवीन लिहिण्याची,वाचण्याची..
आजुबाजुला असलेल्या गोष्टींना बोलण्याची..
हा असा एकमेव माणूस असेल जो निर्जीव वस्तूंशी असा काही संवाद साधतो आणि मग आपण कधीच एकटे नसतो...
प्रेम निसर्ग आयुष्य मृत्यू संघर्ष हे सगळं लिहिताना स्वल्पविराम देऊन वेगळं करता आलं असत  मला पण मग गुलज़ार नसत झालं..ह्या सगळ्यांना एका चष्म्यातून पाहून किती तरी वेगळ्या विश्वात ठेवलंय ह्या अवलियाने..
माझे बाबा RD चे चाहते आणि मग ओघानं गुलज़ार कानावर पडले..
त्यांचं उर्दूविषयीच प्रेम मला माझ्या मराठी वर जीवापाड प्रेम करायला भाग पडत..
खूप गाणी आहेत त्यांची ; मला आवडणारी खूप पण आता एकच सांगेन..त्यांच्यासाठी माझ्याकडून..

"तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नाही
तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नाही.."
तुमच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यांसारखे तुम्ही असच आमच्या आयुष्यात शब्द रुपी रंग  भरावे हि ईश्वरचरणी प्रार्थना..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
                   

मला वाटतं

मला फार वाटायचं किंवा वाटतं की मला गिटार किंवा पियानो वाजवता यायला हवा होता किंवा याव.केस वाढवून त्यांना कुरळे करून घ्यावेत.(आजी त्यांना भांड्याची घासण सारखे म्हणते)
आपला बॅंड (लग्नात वाजवतात तो नव्हे)असावा.पिंक फ्लाॅयड किंवा ब्रायन अॅडम्स च टी शर्ट त्यावर जॅकेट.
उजव्या हातावर ते बॅंडचं बॅंड असावेत.
गाठ मारून किंवा काय ते बांधून राहिलेल्या दोर्या लोंबकाळाव्यात.
(टॅटू मला आवडत नाही.)
गिटारच्या स्वरांमधे तल्लीन होऊन तिला आर्त हाक द्यावी.
माझ सगळ्यातच जवळच गाणं त्या हाकेतून गाव.

“खडा हूँ आज भी वही
...
कि दिल फिर बेकरार है
खडा हूँ आज भी वही
के तेरा इंतजार है
छू लो जो मुझे तुम कभी
खोना जाऊ मैंं रात दिन
नज़रो में तुम हो बसे
...”
त्या वातावरणात धुंद होऊन जावं अ्गदी तस जस बागेत फुलपाखर होतात,पर्वतांवर गिर्यारोहक ज्या बेभानपणे ओरडतात तस बेभान होऊन जावं,
स्वत: लिहिलेल्या  पहिल्या पुस्तकाचा वास लेखकाच्या आयुष्यात दरवळत असतो तसच प्रेक्षकांचा आपल्या गाण्याला  दिलेला कोरस निनादत रहावं .संपूच नाही वाटत.
गिटार वाजवताना एकदमच कमरेतुन मागे वाकून ते तसच वाजवत रहाणं अन आकाशाकडे  पाहून पुटपुटत रहाण ,मला वाटत काहीतरी फार दुःखातून प्रचिती देत ,मला तस करायच आहे.केस हलवून अडचणींना पळा म्हणत जोरात “सडा हक्क” म्हणायच आहे.
जमलं तर माझ आवडत इंग्रजी गाण म्हणायचं आहे.                               

चि. व चि.सौ.कां

मी लग्न करू का?
केले तर टिकेल का?
आणि तो किंवा ती मला कळेल का?
ह्याची थोडी पण वेगळ्या प्रकारे उत्तर देणारा
                                 
                                           "चि. व चि.सौ.कां."

आपलं प्रेम आहे म्हणून लग्न करूया आणि मग नाही पटल  कि मोडूया  ह्या उथळवादाला कुठेतरी समजूतदारपणाचे कुंपण हवे आणि ते कसे हवे हे दाखवलय "चि. व चि.सौ.कां." ह्या चित्रपटामध्ये.
प्रेम करतो म्हणजे माणूस कळतो असं नाही त्यासाठी सहवास किती महत्वाचा आहे हे फार सुंदर दाखवलं आहे.
प्रेमासोबत माणसाच्या सवयी स्वीकाराव्या लागतात.आपल्या काही सवयी सोडाव्या लागतात हे पाहून वाटेल कि हि तडजोड आहे पण नाही ते समर्पण असत..समर्पण नात्यासाठी आणि समर्पण आपल्या माणसाच्या आपल्यासोबत असण्यासाठी.
कोणत्याही चित्रपटाचा आत्मा हे म्हणजे त्याच लेखण.आणि मुधुगंधा कुलकर्णी ह्यांना माझ्याकडून त्रिवार नमन.
ह्या चित्रपटामध्ये अगदी  छोट्या छोट्या दृश्यामध्ये तिने जे मार्मिक भाष्य केले आहे त्याला तोड नाही.आपल्याला तो प्रसंग हसवून जातो पण कुठेतरी आपल्यामधल्या बेजबाबदारपणाला मुस्काटात मारून जातो  थोडक्यात पुणेरी भाषेत सांगायचे तर ''शालीतून जोडे".
आणि हेच प्रसंग परेश मोकाशीने फार सुंदर दिग्दर्शित केले आहात.ह्या माणसाबद्दल मी काय बोलावे.
अभिनयाबद्दल सगळेच जण उत्तम आहेत.कधी कधी काही जण कर्कश वाटतात पण कथेच्या प्रवाहात ती साखरेसारखी विरघळूनही जातात.
मला ह्या चित्रपटाची एक बाजू फार आवडली ती म्हणजे पात्रांची असलेली मार्मिकता..प्रत्येक पात्र हे बोलकं आहे.ते आरसा घेऊन उभं आहे आणि तुम्हाला ते आजूबाजूला घडणारी असलेली माणस दाखवत.
चुका दाखवत आणि चुकांतून कधी शिकत.
आणि प्रबोधन हवं असेल तर नक्कीच आहे फक्त ते तुम्हाला हास्याच्या गाडीत बसून काटेरी वारा लागेल असं आहे.त्यामुळे हसून त्यावर नकीच विचार करायला लावणारा आहे.
शेवटी हेच , श्री आणि सौ होण्याआधी एकमेकांचे तू आणि मी म्हणजे आपण होऊया हे सांगून जाणारा "चि. व चि.सौ.कां." नक्कीच पहा.
आणि आईबाबाला म्हणा लगेच माझं ठरवू नका..पहा  आधी "चि. व चि.सौ.कां."..
" मन हे तुझपाशी रमते
  अन भिरभिरते
  हरते तन वेडे तुझपाशी  घुटमळते.."

गुलाबजाम:जमून आलेल पक्वान्नं

गुलाबजाम खरचं खूप रुचकर झाला आहे .👌🏻
अभिनय,कथा,संवाद ,दिग्दर्शन सगळंच छान कस चुलीवरल्या बेसनासारख
खमंग आणि अप्रतिम झाल आहे.
छायाचित्रण मला तर श्रीखंड जितक आवडत तितक भावल आहे.
मांडणी तर पुरणपोळी सारखी गोड आणि काटेकोर ज्ञाली आहे.
कुठेच अती गंभीरता किंवा बाष्कळ विनोदीपणा जाणवला नाही जसं पुरणपोळीतून पुरण बाहेर न येतां ती सुग्रास बनते तशीच.अगदी तशीच.हो.
जी काही लोकेशन्स निवडली आहेत ती मला अगदी मनापासून आवडली आहेत.
छोट्या छोट्या गोष्टींची खूप काळजी घेतली हे अगदी दिसून येत मग ते नकळत कालसुसंगत गोष्टी दाखवणं असो व व्यक्तिसापेक्ष कालानुरूप वागणं असो.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे “सचिन कुंडलकर “ह्या माणसाने फक्त फूड थिम घेऊन काही बनवायचं म्हणून बनवलं नाहीये त्यात मराठी पारंपरिक जेवण जगाच्या कानोकोपऱ्यात पोहोचावं आणि पंजाबी,गुजराती सारखं मराठी जेवण  आपल्या माणसाला उपलब्ध व्हावं ही तळमळ दिसते..
 खरंच पाहून या आणि सोबत आई च्या हाताचे गुलाबजाम घेऊन जा.
आता नेऊ शकतो ना आत..

Sunday 5 August 2018

मैत्री

बाॅलीवूड आणि मैत्री हे समीकरण फार जून आहे.कितीतरी  सिनेमे येऊन गेले मैत्री ह्या विषयावार.केंद्रबिंदू हा आणि मग आपापल्या आकलनशक्तीने कथेची वर्तुळ मांडून कितीतरी बहारदार सिनेमे बनवले गेले.मित्रांमधील संवाद,उलगडणारे नात आणि मग एकजीव बोलणारे ते जीव.
बाॅलीवूडचा प्रवास दोस्ती ह्या सिनेमापासून ते मेरे सोनू के टीट्टू की स्वीटी व्हाया शोले असा सुरूच आहे आणि तो तसाच राहतो..
एकंदर पाहील तर काही वेगळ दिसणार नाही तेच मित्र आणि मग कथा पण..जर तुमचं आयुष्य मित्र ह्या असामीने व्यापून टाकलेल असेल तरच ते नात किती निस्वार्थ आणि नरकापर्यंत पूरणार आहे ते कळेल.
दोस्ती ह्या चित्रपटामधे पाहील तर दोन्ही मित्र अपंग एक आंधळा तर एक लंगडा.
शोले मधे दोघेही चोर.याराणा मधे एक श्रीमंत एक गरिब. रंग दे बसंती मधे सगळंच वेगळ धर्म जात पंथ. दिल चाहता हा मधे बालपणीची सोबत असली तरी आयुष्या,मानवी नातेसंबंध ह्या कडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा.आणि आता आलेला सोनू के टिट्टू की स्वीटी.
ह्यात समान धागा मैत्री असला तरी मैत्री होताना अट अपेक्षांचा डोलारा, कपड्यांच्या झालरी अन गाड्यांच्या चकाकी नसते.गरज असते त्या क्षणाची ज्यावेळी तो माणूस ह्रदयात भरतो.
ह्या एका गोष्टीसाठी बाॅलीवूडच खरच कौतुक करावंसं वाटत.
पांचट प्रेमकथेपेक्षा मैत्रीवरच अजून चित्रपट बनवावेत .
आज आंग्लभाषेचा मैत्री दिवस असल्याने हा लेखन प्रपंच.


माझ्या आयुष्यात खुप मित्र आहेत आणि त्यासाठी मी मला सुदैवी म्हणेन..
मी सुदामा झालो तरी हरकत नाही कृष्ण आयुष्यात भरभरून मिळावेत हीच इच्छा.

Thursday 19 July 2018

पावसाचे गाणे - पहिलं गाणं

पाऊस आला कि अनाहूतपणे भिजण्याची हौस येते..
पाऊस आला कि आठवण येते , उगाच उमाळे दाटून येतात आणि उगाच डोळ्यांच्या कडा पाणावतात..
पाऊस आला कि भज्यांचा  बेत ठरतो आणि फुरक्या  मारून चहा पिणे ओघाने येते..
हे सगळं असं वेगळं आणि आपलंस वाटणार का घडत बरं?

इतक्या दुरून येणारा पाऊस मला ,तुम्हाला ,सगळ्यांना इतका जवळचा का वाटतो??
त्याचा वेग, गती आणि प्रमाण सगळं सारखं असत पण तो सगळ्यांसाठी वेगळा त्यांचा  हक्काचा  साथीदार असतो..कुणाला खिडकीतून हात सोडून गेलेल्या प्रियतमासारखा भासतो तर कुणाला उगाच चिखल करणारा आचरट  निसर्गाच रूप..कुणाला मुक्त दिसतो तर कुणाला गरजेपुरता देव विद्रुप..
कुणासाठी काही असला तरी सगळ्यांना त्याच्याशी बोलायचं..

मग आपण आज पाहूया कवी सौमित्राला त्याच्याशी काय बोलायचं..

पाऊसाचे  गाणे - पुन्हा पावसालाच सांगायचंय

                  " पुन्हा  ढग  दाटून  येतात  पुन्हा  आठवणी  जाग्या  होतात
                   तिचे  माझे  सारेच  पावसाळे  माझ्या  मनात  भिजून  जातात
                    पुन्हा  पाऊस  ओला  ओला  पुन्हा  पाऊस  बांधून  झुला
                    तिच्याकडले  उरले  झोके  परत  करतो  माझे  मला
                    पुन्हा  पाऊस  खूप  ऐकतो  पुन्हा  पाऊस  खूप  बोलतो
                    त्याच्य  माझ्या  गप्पांमधले  तिचे  थेम्ब  अलगद  झेलतो
                    पुन्हा  पावसाला  सांगतो  मी i पुन्हा  पावसाशी  बोलतो  मी
                   माझे  तिचे  आठवणी  थेम्ब  पुन्हा  पावसालाच  मागतो  मी "

काय लिहिलंय ना !! येणाऱ्या पावसापेक्षा त्याला प्रेमाने आपल्याकडे पाठवणारे ढग तिच्या आठवणी जाग्या करतात. मनाची अशी काही अवस्था होते कि आता डोळ्यांमधून पाणी न येता  ते मनाच्या चक्षुने पाझरू लागत आणि मग तिची पहिली भेट, तिची ती पहिली मिठी आणि ते सगळंच पावसाळ्याचे आगमन होऊन मनात असा काही कोलाहोल माजतो कि आता कोणती आठवण काढून रडावं आणि हसावं हा गोंधळ उडतो आणि त्यात मी अलगद ह्या माझ्या पावसाळी मित्रांसोबत चिंब भिजून जातो..
आणि हा माझा दूरचा मित्र इतका माझ्यावर प्रेम करतो कि तिच्या माझ्या प्रेमाच्या सफरीवर हाही आला होता.ह्याने आमच्या प्रेमाचा बहर पाहिलं.मोहरलेलं प्रेम अनुभवलं आणि आमच्या गप्पांच्या झुल्याला अलगद झोके देत राहिला आणि आज तेच झोके थेंबांनी मला हळूच वापस करतोय..
मी ह्याच्याशी असंबद्ध बोलतो.कुठेही असो डोंगरावर,गाडीवर ,आडोश्याला वा  खिडकीत..पण बोलतो आणि मग काळाच्या पडद्यामागे गेलेलं काही क्षण ,तिचे-माझे क्षण त्यालाच मागतो मी...

                                      "पुन्हा  पावसालाच  सांगायचे
                                       कुणाला  किती  थेम्ब  वाटायचे

                                       मऊ  कापसाने  दारी  गोठली
                                       ढगांनी  किती  खोल  उतरायचे

                                      घराणे  मला  आज  समजावले
                                       भिजुनी  घरी  रोज  परतायचे

                                      तुझी  असावे  पाझरू  लागत
                                      खऱ्या पावसाने कुठे  जायचे?"

मिलिंद इंगळेंनी लावलेली  चाल,दिलेला आवाज  आणि सौमित्रचे शब्द इतके चपखल आहेत  की वाटत आता खरंच मी पावसाला काही सांगणार आहे आणि त्यांनी सांगितलंच आहे ,आपल्या  सगळ्यांकडून..
परत परत पावसाला सांगणार आहे,,आज सांगणार .काल सांगितलं ,उद्या सांगेन..

"असेन मी नसेन मी
तरी असेल पाऊस हा
कुणीतरी असेल ह्याला सांगायला "
पाऊस हा फोटॉन आहे..आठवणींचे ,क्षणांचे, विरहाचे, प्रेमाचे, मिलनाची गाठोडे  घेऊन हिंडणारा फोटॉन..
म्हणून मित्रा  गाठोडं हळू हळू सोड..सगळ्यांच्या तळ  हातावर हवं तितकं आणि योग्य तळ कर..
माझ्या अश्रूंचा प्रवास(ह्यात खूप काही आलं ) आज कुणीतरी अडवला आहे..आणि मग ह्या ढगांना मी परत  का बोलावू?
त्यांनी किती यायचं आणि माझा बांध तोडायचा ..आता मीच मला माझ्या बांधलेल्या मनस्वी घरात भिजून नेणार आहे...कल्पनांना आणि विचारांना  भिजवाव  लागेल ना..चिंब भिजणे म्हणजे माझे मला भेटणे..माझ्यातल्या  तिला पाहणे..आणि मग तिला पाहून माझे हरवणे  माझ्यातच..म्हणून "घराने मला आज समजावले भिजून रोज घरी परतायचे .."
हे आहे पण कधी मला हि तू आठवत असशील..हातांवर तळ साचवून त्यात चिंब भिजत असशील आणि माझ्या  मनाच्या कोपऱ्यातली तू हि हेच करतेस..
हळूच माझी कविता आठवून  आसवं गाळत असशील.कविता म्हणतही असशील पण रडू नकोस..तू रडलीस तर हा पाऊस निघून जाईल.त्याला वाटेल त्याने रडवले तुला आणि मग आपल्या  दोघांचे झोके मी मागू कुणाला?
रडू नकोस..
म्हणूनच तर
"पुन्हा  पावसालाच  सांगायचे
कुणाला  किती  थेंब  वाटायचे "

माझ्याकडून थोडंसं पावसासाठी:
“ पावसासाठी काहीतरी
त्याला काय देतो नाहीतरी??
मी आणि तो असलो ;कि ती
येते आपसूकच
लय तो, चाल ती आणि शब्द माझेच...”

Sunday 24 June 2018

आठवणीतला पंचम :कॅस्सेट्स ते सारेगम कारवां

संध्याकाळची वेळ.ऊन उतरलेलं,आपापली कामे आटपून सगळी गल्ली ओट्यावर बसलेली असायची आणि आमच्या घरातून किशोरचा आवाज ऐकू येई आणि हळूहळू सगळी मंडळी आमच्या ओट्यावर येऊ लागत.
कॅसेटस बदलत असत.A side वरून B side होत असे.किशोर वरून रफी,मन्नाडे वरून कुमार सानू होई,पण एक व्यक्ती क्वचितच बदलला.ज्याने संगीताला किती बदलल,वेगळी कोणती दिशा दिली ह्यापेक्षा त्याने संगीत किती जणांना अनुभवयाला लावल हा तो माणूस.
मोठं कपाळ,बोलके डोळे आणि तितकच त्याच्या व्यक्तिमत्वाची छाप पडणारा जाडसर काड्यांचा चष्मा आणि त्यावर टोपी.महान संगीतकारांच्या पंक्तीमध्ये स्वत:साठी अलगद पण फार मोठी अशी ध्रुवताऱ्यासारखी जागा  निर्माण केलेल अतुलनीय व्यक्तिमत्व.राहूल देव बर्मन..तीन दिवसांनी ह्या अवलियाचा वाढदिवस.
घरातूनच संगीताचं वरदान मिळालेला हा माणूस जन्म गाणे(रडणे ) सारेगमप मध्ये गात असल्याने त्याच्या वडिलांनी सचिनदानी यांचं टोपणनाव पंचम ठेवल.अजूनही बरेचसे किस्से आहेत या नावाचे.
अशा सुरेल माणसाने संगीताचे गुणग्रहण वडिलांपासून सुरु करून मग ह्यां"अली अकबर खान " आणि "समता प्रसाद " दिग्गजांकडून घेतले.सलील चौधरीला पंचम  गुरु मानत.ह्या शिक्षणाच्या  प्रवासातून स्वतःच्या अशा एका वेगळ्या  शैलीच जाळ विणायला ह्याने सुरू केलं.खरे तर या जाळ्याची सुरवात तेव्हाच झाली जेव्हा सचिनदानी फंटूश चित्रपटासाठी पंचमनी केलेली लहानपणीची धून वापरली होती.पंचमचा पहिला स्वतंत्र चित्रपट हा "राज" होता जो प्रदर्शित झालाच नाही."छोटे नवाब" हा पंचमचा प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट जो "मेहमूद" सोबतचा होता आणि  मग ह्या जोडीने जो काही दंगा केलाय तो लाजवाब आहे.

"तिसरी मंझिल" हा चित्रपट आहे ज्याने पंचमला खरं यश चाखायला लावल.सगळी गाणी बेफाम चालली.
अभिनेता "शम्मी कपूर "म्हणलं कि आवाज रफी आणि संगीत "शंकर जयकिशन" अस होत.मजरूह सुलतानपुरीमुळे पंचम ला हा चित्रपट मिळाला पण शम्मी काही ऐकायला तयार नव्हता.शंकर जयकिशन वर अडून बसलेला पण पंचम ने हे शिवधनुष्या लीलया पेललं आणि गाणी बेफाम चालावी.
"सचिनदा" आराधनाचे गाणे मुद्रित करताना आजारी पडले आणि जबाबदारी येऊन पडली त्यांना साहाय्य करणार्या पंचमवर,ह्याआधी असच साहाय्य करताना स्वतःच्या आग्रहास्तव "प्यार का मौसम"मधे किशोरकडून "तुम बिन" हे गाणं गाऊन घेतलं होत तेही यॉडलिंग सहित जो प्रकार भारतीय संगीत जगताला अगदी नवीन होता. आणि नेमकं हेच त्याने आराधना च्या वेळेस केलं.किशोरला बॊलावून जवळपास सगळीच गाणी त्याच्याकडून गाऊन घेतली आणि तिथेच ह्या द्वयीचा उदय झाला.
पुढे हे समीकरण लोणच्यासारखं मुरात गेलं आणि तितकंच चविष्ट बनत गेलं.
अजून एका माणसासोबत ह्याचा मुरंबा होता."गुलजार".ह्या नात्याविषयी लिहायला शब्द कमी आणि लय अपुरी पडेल.अजूनही धुक्यातून गुलजार पंचांची वाट पाहत असतात.
पंचम वर असा आरोप होतो कि त्याने किशोर ला झुकत माप दिल.कमी प्रमाणात ते सत्य असाल तरी "हम किसीसे कम नही" मधल  गाणं अाठवा "क्या हुआ तेरा वादा" जे रफीने गायलं आहे.रफी त्या गाण्याच्या वेळेस पूर्णपणे खचलेला होता त्याला धीर देऊन हे गाणं गाऊन घेणारा पंचमच होता आणि तेच गाणं जास्त गाजलं.
पंचम हा काही फक्त पॉप किंवा यॉडलिंग पुरता मर्यादित नव्हता.कुठे राजेश हेलनच ते "दुनिया मै लोगो को"आणि कुठे "परिचय" मधल क्लासिकल गाणं "बीती ना बीताई  रैना".आंधी मधलं "तेरा बिना जिंदगी से" असो वा "चुरा लिया है तुमने जो  दिल को" असो हि सगळी वेगळ्या वाटेवरची एकाच झाडाची वेगवेगळी फुले आहेत.
पंचमला फक्त संगीत आणि संगीतच दिसत असे.ह्या वेडापायी तो इतका अस्वस्थ असे कि चहा थंड होण्याची वाट पाहत नसे पण पाणी टाकून पिऊन टाके.ह्याच वेडापायी त्याने वस्तूंमधून सूर काढले.
अशा हुरहुन्नरी माणसाचा उत्तरार्ध मात्र तितकासा चांगला नव्हता .आपले म्हणणारे साथ सोडत होते.त्यातही त्याने वर्तमानपत्रातल्या बातमीप्रमाणे भासणाऱ्या शब्दांच सुंदर गाणं केलं आणि बक्षीस मात्र गायक आणि गीतकाराला मिळाले.
पण हरेल तो पंचम नव्हे.शेवटच्या चेंडूवर त्याने छक्का  मारूनच संगीत रंगभूमी सोडली."१९४२ लव्हस्टोरी". पण हे यश न पाहताच तो गेला.प्रत्येक गाणं मोती आणि प्रत्येक चाल स्वर्गीय वाटावी अशी अन हृदयात खोलवर जाऊन मुरणारी.
तो ज्या लोकांसोबत काम करायचा त्यांची किती काळजी करायचा हे त्यांच्या ओघळणाऱ्या अश्रुंवरून कळून येत.स्वतःच्या पैशानी गाण्यांचं रेकॉर्डिंग करणारा खरा संगीतप्रेमी.आज दिसत नसेलही पण आपल्यात आहे.तो सतत प्रवास करतोय.एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे.एका संगीतकाराकडून दुसऱ्या संगीतकाराकडे ."कॅस्सेट्स" कडून "सारेगम कारवां" कडे. त्याने दिलेलं ओंझळीत मावेल तितकं घ्यायचं आणि बस्स त्याच्यासोब गुणगुणायच..
"मुसाफ़िर हूँ मैं यारों
ना घर है ना ठिकाना
मुझे चलते जाना है, बस, चलते जाना
एक राह रुक गई, तो और जुड़ गई
मैं मुड़ा तो साथ-साथ, राह मुड़ गई
हवा के परों पे, मेरा आशियाना"
वाढदिवसाच्या हार्दिक अधिक आणि आधीच  शुभेच्छा पंचम..

Saturday 5 May 2018

डाक


पिवळ्या रंगाच एक कडक असा कागद मिळायचा.
एका बाजूला पत्ता लिहिण्यासाठी ओळी असायच्या..उरलेल्या मोकळ्या जागेत मग जे लिहायच ते लिहायच.
माझे आजोबा आईला पत्र लिहायचे.फोन नव्हताच अस नाही पण महाग होता आणि त्या पैशात तीन चार वेळेस पत्र लिहून व्हायचं.
खूप काही जागा नसायची पण मुलीला मी आठवतो हे तिची तब्येत विचारून जाणून घेण्याचा प्रयत्न असायचा.
त्यांच्या ऋणानुबंधासोबत मला डाक घेऊन येणार्या काकांच जास्त अप्रूप वाटायच.
किती तरी भावना,कितीतरी आवेश घेऊन येणारा हा माणूस..
मी नेहमी त्यांना विचारायचो माझ पत्र कधी येणार.
येईल रे अस म्हणायचे आणि हसून सायकलवरून डाकांचा भार घेऊन निघून जायचे.काही वर्षांनी मला
शिष्यवृत्ती मिळाल्याच पत्र आल पण ते काका नव्हते तेव्हा आणि आजोबांनी नंतर कधी पत्र पाठवलच नाही..मी मोठा झालो पण आजही त्यांच्या सायकलीचा आवाज कानात रूंजी घालत 
असतो.
ह्याच पत्रांना पाठवायला तिकिट चिटकवावी लागत असे.
वेगवेगळ्या महापुरूषांचे चित्र असलेली.
त्यांचा नेमका अर्थ आजही माहीत नाही मला.
कोणत तिकिट कधी वापरतात ह्याच कवडीमोलही 
ज्ञान नाही.खरतर त्याच फारस घेणदेण नव्हतच मला तेव्हा.
ती तिकिट आणून वही भरवण्याची हौस. माझे आबा ही हौस पूर्ण करायचे.
हळूहळू दिवस जात होते आणि काळ सरत होता आणि डाक पेक्षा दूरध्वनी जवळचा झाला.
आज कितीतरी अद्ययावत साधन आलेली आहेत पण भावना वाचून आसव गाळण राहून जात.
भीतीपोटी प्रेमपत्र उशाशी कुणी ठेवत नाही.मामाच पत्र हा खेळ कदाचित म्हणून कुणी खेळत नसेल.
बिलही आजकाल फार घरी येत नाहीत.
राखी तरी येते का टपालाने?
जग बदलत तस बदलाव लागत पण डाक,तिकिट आणि पोस्टमन काका सदैव आठवणीत असणार.
उन्हाळयात त्यांची आठवण दाटून आली कारण त्यांना फक्त थोडंसं पाणी लागायच.बस्स.
बाकी सायकल ,टपाल आणि प्रवास असाच असायचा.
ही आठवण त्यांना समर्पित.

Tuesday 3 April 2018

विश्वचषक :२००७ ते २०११



आज ७ वर्ष पूर्ण झाली.२८ वर्षानंतर जिंकलेल्या जगज्जेतेपदाला.७ क्रमांकाच्या जर्सी असलेल्या माणसाला हा मानाचा तुरा स्वतःच्या शिरपेचात रोवून घेताना पाहून अंगावर काटा आला होता,ती आठवण आजही काटा आणते.
ह्याची सुरवात अशाच एका काळ्या "७" ने झाली होती.२००७ च्या वर्ल्ड कप मध्ये क्रिकेट जगतात मिसुरडही न फुटलेला संघ बांगलादेशने लाजिरवाणा पराभव केला होता.
ह्याच शल्य घेऊन सगळ्याच तमाम खेळाडूंनी क्रिकेट च्या नवीन अपत्याच्या जागतिक स्पर्धेत खेळण्यास नकार दिला.
आणि मग सेनापती एका माणसाला केलं.."महेंद्रसिंग धोनी"..
आणि हा सेनापती भारतीय ,जागतिक क्रिकेट चा नेपलिन बोनापार्ट ठरेल हे कुणाच्या स्वप्नवत नसेल तेव्हा. 
वर्ष २००७.गावातील लाईट गेलेली.जीव वर खाली होत होता.हनुमाच्या पारावर सगळे जमलेले.इन्व्हर्टेट बदल चर्चा सुरु होती आणि रेडिओ भारतीय गोलंदाजांच्या नावाने रडत होता.मिस्बाह हरभजनला झोड झोडत होता.आणि एक चाल आणि प्रिय शत्रूस परत एकदा शिताफीने मात.जोगिंदर साहेबांच्या खांद्यावर विश्वासाने बंदूक ठेवून धोनी भाऊंनी २००७ चा पहिलावहिला विश्वचषक जिंकला.२००७ ने शेवटी शेवटी का होईना भरभरून दिल.
तिथून खरंच एका पर्वाला सुरवात झाली.पंटर च्या संघाला त्यांच्या मातीत जाऊन CB  सिरीज जिंकली.अंतिम सामने २-० ने जिंकून.भारत कसोटी मध्ये अव्वल क्रमांकावर पोहोचला.त्याच पंटरच्या संघाला ४-० ने कसोटी मालिका हरवून नळाखाली अंघोळ करायला लावली.
अशा कितीतरी मालिका आपला संघ जिंकत होता आणि हा सेनापती अश्वारूढ होऊन जगात दुमदुमत होता.
"माझ्याआधी संघ" ह्या एका वृत्तीने भारताला खूप चांगले फलंदाज आणि गोलंदाज दिले.
जेष्ठ असले ,कितीही चांगले फलंदाज असले तरी क्षेत्ररक्षणात कमी पडून चालणार नाही.तुम्हाला बाहेर बसावं लागेल.आणि ह्याचा परिणाम म्हणून कित्येक सामने आपण क्षेत्ररक्षणाच्या जोरावर जिंकले.
ओपनर होता येत असताना संघाला माझी गरज खालच्या क्रमांकावर खेळण्याची आहे म्हणून मी खाली खेळेन आणि तिथेच आम्हाला आमचा "THE Finisher -धोनी" मिळाला.
आणि ह्याच विश्वासामुळे धवन,रोहित.आणि कोहली सारखे दर्जेदार आणि गुणवान खेळाडू देशाला मिळाले.
सगळेच कर्णधार कमी अधिक प्रमाणात हेकेखोर असतात.हरभजन आणि कुंबळे साठी भांडणारा आपला दादा आठवा.आपल्या हक्काच्या  खेळाडू साठी असं करावं लागत.आणि हाच विश्वास सार्थ करून दाखवला तो अश्विन आणि जडेजा ने.
धोनी ने किती लांबचा विचार केला होता २००८ मधेच ते आपल्याला वरवरून नाही कळणार.जेव्हा आपण दुसऱ्या संघाना पाहू तेव्हा कळेल.
अर्जुन रणतुंगा एकदा म्हणाला होता कि संगकारा आणि जयवर्धने ह्यांनी संघ बांधणी साठी काही केलंच नाही.कमी अधिक प्रमाणात असं बऱ्याच  संघांसोबत झालं आहे.
वेस्ट इंडिज श्रीलंका,ऑस्ट्रेलिया.काही खेळाडूंच्या जाण्याने पूर्ण संघ कोलमडल्यात जमा झाला.
सचिन,द्रविड,कुंबळे,गांगुली,सेहवाग ह्यांनी इच्छेने मैदान सोडलं खरं आणि त्यांची उणीव भासते सुद्धा पण संघाच्या कामगिरीवर परिणाम नाही झाला.आणि कसोटी  मध्ये सुद्धा धोनी गेल्याने उणीव भासते,कधी Stumping miss केली "साहू" ने तर राग येतो पण संघाच्या कामगिरीवर परिणाम नाही झाला.
हे धोनीचं कर्णधार म्हणून मोठं यश आहे असं मला वाटत.
आलटूनपालटून सेहवाग,सचिन,गंभीर ला खेळवण्यामागे कारण एकच होत,ह्यांच्यासोबत जास्तीत जास्त नवोदितांना खेळण्याची संधी मिळावी.
पण उरात एक शल्य होत ते म्हणजे २००७ चा पराभव.
 २ एप्रिल २०११ इज़द्ल आणि हा दिवस सुवर्ण अक्षराने इतिहासात लिहिला गेला.अंतिम सामन्यात षटकार मारून देशाला जिंकून देणं फार गर्वाचा क्षण आहे.पण गंभीर ,युवराज आणि सगळ्या संघाचं तितकाच अभिनंदन करावं लागेल.योगदान सगळ्याच खेळाडूंचं आहे.
असाच २०१९ चा विश्वचषक आपण धोनीला निरोप देताना जिंकावा अशी ह्या दिनी अशा व्यक्त करतो.
  

Wednesday 28 March 2018

ग्रेस

रेडिओ जवळ बसून "शुक्रतारा "लागण्याची  वाट पाहत होतो.तरुण रक्त,भाव गीतांचा वेड अन त्यात पाडगावकर..रेडिओ आईमुळे ऐकण्याची सवय होती.एक गाणं लागलं.दोन  ओळी ऐकल्या की कळलं पंडित मंगेशकरांचा आवाज आहे.जस जस गाणं पुढे सरकत होत तस तस मी स्वतःला विसरत चाललो होतो.
रेडिओ म्हणजे हरवलेली प्रेयसी भेटली आहे ह्या अविर्भावात त्याच्या कडे पाहत होतो.
ते गाणं होत ,"ती गेली ,तेव्हा रिमझिम ".तेव्हापासून मी जो काही ग्रेसच्या अगम्यतेत वहावत गेलो आहे ते आजतागायत डुबून जिवंत आहे.
ह्या अवलियाचा २६ मार्च ह्या दिनी स्मृतिदिन."माणिक सीताराम गोडघाटे".
इन्ग्रिड बर्गमन चा चित्रपट पाहून तिच्या ग्रेसवर मोहून ह्यांनी आम्हाला आमच्या जाणिवांना,नेणिवांना आकार देणाराग्रेसदिला.
ह्यांच्या कविता कळाव्यात म्हणून वाचणाऱ्याला ग्रेस कधीच कळणार नाहीत.
एकाच कवितेमध्ये निसर्गाला,जाणिवांना वळणे घालून हा माणूस तुम्हाला सजीवांच्या प्रेमात पाडेल,विरहात भिजवेल किंवा मग अस्वस्थतेच्या रानात नेऊन सोडेल.करा आता विहार तुम्ही.
आणि आपण वाचक म्हणून अर्थ शोधावा;फक्त तो  वैश्विक किंवा प्रस्थापित कवींसारखा कळता असावा हि अपेक्षा नको.
सायंकाळी फक्त सूर्यच जाणं, वारेसाच हळुवारपणे वहाण ,समईच मंद तेवत असण अनुभवायचं असत बस्स.
संध्याकाळच्या कवितामी कितीदा वाचला आहे ,सोबतच असतो.तसच काहीसमितवा आहे.
स्मृतिगंधही कविता सतत माझ्या मनात रुंजी घालत असते.
           "तू उदास मी उदास मेघही उदासले"
           "स्मृतीतले विदग्ध नाद पैंजणात सांडावे"
ह्या दोन ओळीवरच माझी स्वारी कित्येक दिवस रेंगाळत होती.ती अजूनही तिथेच अडकून समोर जाते.
आज ग्रेस सोबत नाहीत आपल्या आणि ह्या दोन ओळी स्वतःसाठीच लिहून ठेवल्या असच वाटत.(आपल्याकडून त्यांच्यासाठी).
ग्रेसची राजकीय ,सामाजिक भूमिका फार मोठी,दखलपात्र नसेल किंवा फार नाहीच पण काही बाबी आहेत ज्या त्यांचे समाजाभिमुख संवेदनशील मन सांगून जातात.
ते म्हणतात कलाकार हा समाजशील असतो पण समाजधार्जिणा नसतो.
काय सुचवायचं असेल ?
सडेतोडपणे म्हणतात “An Artist is not Special Kind of Man and Every man is Special kind of Artist “हे साफ खोटं आहे.उगाच बर वाटाव म्हणून का?आणि कुणाला?सर्वसामान्यांना?
त्यांना हे अति आत्मसंतुष्टीचं द्योतक वाटत असणार.त्यांच आपल सरळ असत,”An Artist is differently thousand times special kind of Man”.कलाकाराच समाजावर प्रेम असत.कलाकार हा समाजशील असतो पण समाजधार्जिणा नसतो.
काय सुचवायचं असेल ?
जी..कुलकर्णींच्या आठवणीतल्या कार्यक्रमात म्हणाले कि माझ्या दंतकथा आहेत आणि त्यामुळे मला लोक घाबरतात.माझ्याकडे शस्त्र नाही,राजकीय पालखीचं ओझं नाही ,मी गुंडा नाही तरी हे घाबरणं म्हणजे ,”It is the best possible type of lerical attitude I am getting from my wonderful Readers.”
आहे का दुःख,तक्रार नाही ना.रडगाऱ्हाण नाही.
मी कलाकार असून माझी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नाही कि वेड्याच्या इस्पितळात नोंद नाही ह्यापेक्षा अजून काय सामाजिक कार्य अपेक्षित आहे.”
राहून  राहून वाटत हाच तर तो समाजशील आणि समाजधार्जिणा फरक तर नाही ना.
ग्रेसांनी सांगितलेला पुरुषार्थाचा अर्थ किती गर्भित समाजाभिमुख आहे ते जाणवत आणि कलाकार निश्चितपणे समाजाला बांधलेला असतो ह्याची जाणीव झाली."आजच्या आधुनिक काळातली बाईपर्यंतच्या सर्व विकासाची परिवर्तने सृजनशीलतेच्या दिशेतून तपासून पाहणे हीच माझ्या पुरुष असण्याच्या पुरुषार्थाची व्याख्या होय"
ज्यांना कुणाला पुरुषार्थाचा गर्व/माज आहे त्यांनी ही ओळ मनावर कोरावी.
मला आजही त्यांची कविता त्रासदायक एकांतातून ,अपेक्षांच्या जाळ्यातून आणि ऊतू जाणाऱ्या प्रेमाच्या डोहातून अलगद उचलून बाहेर आणते.
कुणाला फार बोलायची सांगायची गरज लागत नाही.
      "ज्याचे त्याने घ्यावे,ओंजळीत पाणी,"
       “कुणासाठी कुणी थांबू नये"
ग्रेसला यायला सायंकाळ लागत नाही.ते मनात आले कि सायंकाळ होते.
जमेल तस बोलतो आम्ही.सगळंच कळत असं नाही पण दुर्बोध नक्कीच नसत.
राहून राहून वाटत ग्रेसच साहित्य जागतिक स्तरावर पोहोचावं.जग ग्रेस-वेडाने पछाडून जावं.
त्यांच लिखाण वाचून एक कलाकार म्हणून त्यांची किती झीज झाली असेल नाही पण हे हि ते आधीच म्हणून गेले "की कवीचे जगणे आणि त्याचे तथाकथित लिखणे  ह्यातून त्याच्या शरीराची आणि तितकीच  त्याच्या आत्म्याची झीज होत असते.काही वेळा स्फोट वा आघात इतके जबरदस्त असतात कि त्याचे तुकडेही पडतात आणि ते तुकडे अथवा झीज पुन्हा जोडता येत नाहीत"
असेच असंख्य तुकडे आणि झीज घेऊन ग्रेस आपल्यातून निघून गेला .
ग्रेस,मला तुम्हाला भेटून मला कळलेला तुमच्या कवितेचा अर्थ सांगायचा होता.माझी एखादी कविता ऐकवायची होती.
तुम्ही साधत असलेला एकांताशी संवाद ऐकायचा होता.
तुम्ही कुठे आहात नाही माहिती रोज ती सांयकाळी झुळूक "ग्रेस"च्या कवितेची स्पंदने अंतरंगात फुलवते.
मी इतका नक्कीच मोठा नाही कि तुमचे आभार मानावे पण तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचे ऋण माझ्यावर नक्कीच आहे आणि त्यासाठी मी देवाचा नक्कीच शतजन्मी आभारी असेन.
त्याच संध्याकाळच्या करंगळीला धरून,मावळतीच्या सूर्याला पाहून,मंद प्रकाश आणि त्यात तेवणारी त्या वातीला पाहून तुमच्या स्मृतिदिनी मी काही शब्द सुमने तुमच्या चरणी अर्पण करत आहे ती मानून घ्यावी.(त्यांना सुगंध नसेल त्यांना रूप नसेल पण ती नक्कीच फुलली तुमच्यासाठीच आहेत)
     “एक तो दिवस असतो आणि एक ती रात्र
     आणि मग त्यांना सांधणारी असते तुझी          
     सांयकाळ..
     असो उठलेले काहूर विचारांचे वा
     उठली असो भावनांची मनात राळ..
     असो कुठले स्थान असो कुठले गाव.
     असो सोबत कुणी माझ्या
     रंक अथवा राव..
     ती असेल लाडकी तुझी
     सतत माझ्यासोबत.
    "ग्रेस" सांगू काय तुला
    काव्याने तुझ्या केले
    काय आमच्यासोबत.
    शब्दांची बाग तुझी
    वा गाण्यांची चाल
    तोच काय आमचा वारसा
    उद्या ,आज आणि काल..”

               -ग्रेसाक्त

नवरात्रातील कीर्तनांचे सार

 माझ्या गावात मुदखेडमधे श्री कालेजी देवी (मूळ स्थान माहूर) मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव खूप उत्साहात साजरा करतात. कीर्तन , भजन आणि असे असंख्...